खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला
By admin | Published: June 17, 2017 02:15 AM2017-06-17T02:15:13+5:302017-06-17T02:15:13+5:30
विवाहितेस पळवून नेल्याच्या वादातून झालेल्या एका खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र
विवाहितेस पळवून नेल्याच्या वादातून घडली होती घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहितेस पळवून नेल्याच्या वादातून झालेल्या एका खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
भेडन सकिंदर पुरवले(४२) रा. सत्रापूर कन्हान, असे आरोपीचे तर मिठाईलाल भिसे, असे जखमीचे नाव आहे.
प्रकरण असे की, कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका विवाहितेला जखमी मिठाईलाल भिसे याचा पुतण्या अनिल भिसे याने पळवून नेले होते. नेमक्या याच कारणावरून १३ मे २०१७ रोजी विवाहितेचा नजीकचा नातेवाईक भेडन पुरवले याने अनिल भिसे याला गाठले होते. भेडन आणि अनिलमध्ये जोरदार भांडण सुरू असताना मिठाईलाल हा आरोपीला समजावण्यास गेला होता. त्यामुळे चिडून भेडन याने मिठाईलाल याच्या तोंडावर, डोक्यावर, गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करून गंभीररीत्या जखमी केले होते.
मिठाईलाल याच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून भेडन याला अटक केली होती. मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी भेडन याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामिनास सरकार पक्षाकडून जबरदस्त विरोध करण्यात आला.
आरोपी हा क्रूर स्वभावाचा असून त्याच्याविरुद्ध मारहाण व दुखापतीचे चार गुन्हे दाखल आहेत. तो कोणताही कामधंदा करीत नसून उलट मुलाच्या कमाईवर जगतो. त्याला जामिनावर सोडल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणून फितवण्याची अधिक शक्यता आहे. न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपी भेडन पुरवले याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील श्रीकांत गौळकर यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक डी. आर. लोणारे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.