स्फोटकांनी उडविताहेत डिफेन्सच्या टेकड्या
By Admin | Published: October 16, 2015 03:12 AM2015-10-16T03:12:55+5:302015-10-16T03:12:55+5:30
कोराडीच्या मागील सुरादेवीमध्ये स्फोट करून डिफेन्सच्या टेकड्या खुलेआम उडविण्यात येत आहेत.
सुरादेवी कामठीतील घटना : पोलीस, महसूल, सेनेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
योगेंद्र शंभरकर नागपूर
कोराडीच्या मागील सुरादेवीमध्ये स्फोट करून डिफेन्सच्या टेकड्या खुलेआम उडविण्यात येत आहेत. अवैधरीत्या स्फोट करून कोट्यवधी रुपयांच्या मुरुमाचे उत्खनन करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सेनेच्या मुंबईतील इस्टेट आॅफिसकडून कंत्राटदाराला फक्त जमिनीवर पडलेल्या किंवा पारंपरिक शस्त्राने मुरुम काढण्याची परवानगी मिळाली आहे. संबंधित कंत्राटदारास कुठलाही विस्फोट न करण्याच्या अटीवर मुरुमाची वाहतूक करण्याचे काम देण्यात आले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून खुलेआम मोठी स्फोटके वापरून मुरुमाचे उत्खनन करण्यात येत असून गुरुवारी सेना, प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरात दोन पोलिसांना तैनात केले आहे.
विशेष बाब म्हणजे, या टेकड्यांच्या बाजूलाच सेनेच्या प्रशिक्षणार्थ्यांचे शिबिर आहे. येथे शेकडो युवक सैनिकाचे प्रशिक्षण घेत आहेत. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर महसूल आणि सेनेचे अधिकारी घटनेच्या तपासासाठी पोहचत आहेत. या ठिकाणी नियमांना डावलून बेधडक होत असलेले उत्खनन पाहून महसूल विभाग आणि कामठी सेना कँटोनमेंटचे वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. कागदपत्रांवर असलेल्या कंत्राटदार पवन मनीष शिंदे, कामठी याच्या मनमानीची माहिती मिळाल्यानंतर तो फरार झाला आहे. स्थानिक नागरिकांनुसार त्याच्या कृत्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीराम सेनेचे पदाधिकारी रणजित सफेलकर आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी कोराडी पोलीस, महसुल आणि सेनेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. दरम्यान घटनास्थळी असलेले कर्मचारी, दोन क्रशर मशीनचे ट्रॅक्टर आणि वाहतूक करणारे दहा चाकांचे ट्रक तेथून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील जेसीबी मशीनला ताब्यात घेऊन तेथे पोलिसांना तैनात केले.
याबाबत माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, कोराडीचे निरीक्षक रामकृष्ण महल्ले सुरादेवी गावात पोहोचले. परंतु त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले नाही. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेश निखार, पोलिसांच्या गुप्तहेर शाखेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
कागदपत्रांशिवाय काही बोलणे अशक्य
घटनेबाबत गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी सांगितले की, त्यांना फक्त अवैधरीत्या विस्फोट करून उत्खनन करण्याची माहिती मिळाली आहे. विनातक्रार आणि कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही.
त्यांनी कोराडीच्या अधिकाऱ्यांना निविदेबाबत कागदपत्र आणि आरोपी कंत्राटदाराची माहिती घेण्याचे निर्देश दिले. तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक महल्ले यांनी यावेळी दिले.