अपयशाच्या पुस्तकातच यशाची व्याख्या
By admin | Published: September 24, 2016 01:24 AM2016-09-24T01:24:01+5:302016-09-24T01:24:01+5:30
लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.
सचिन बुरघाटे : शासकीय विज्ञान संस्थेतील प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांत चैतन्य
नागपूर : लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. अपयश हे संपूर्ण पुस्तक आहे. ज्याच्या शेवटच्या पानावर यश लिहिलेले आहे आणि ते वाचायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचावेच लागेल, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर सचिन बुरघाटे यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना यशाची खरी व्याख्या सांगितली.
शासकीय विज्ञान संस्थेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अॅण्ड सॉफ्ट स्किल्स या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर एफडीएचे प्रशासकीय अधिकारी डॉ. पी. एम.बल्लाळ, याच संस्थेचे माजी विद्यार्थी व आता आयएएस अधिकारी असलेले शंतनू गोतमारे, मी टू वूई फाऊंडेशनचे डॉ. प्रकाश इटनकर व संस्थेचे संचालक डॉ. रामदास आत्राम उपस्थित होते. याप्रसंगी या मान्यवरांच्या हस्ते करिअर कौन्सिलिंग सेल अॅण्ड प्लेसमेंट सेलचे उद्घाटन करण्यात आले. सचिन बुरघाटे यांनी पुढे आपल्या अनोख्या शैलीने विविध उदाहरणे सादर करीत विद्यार्थ्यांची मने जिंकली. अपयशावर कशी मात करायची यावर ते बोलत होते. अब्राहम लिंकन, धिरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन या सर्व यशस्वी मान्यवरांनाही करिअरच्या सुरुवातीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. पण, केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी या जगात स्वत:ला सिद्ध केले. त्यामुळे सुरुवातीलाच मनात अपयशाची भीती बाळगून कुठल्याही कार्याची सुरुवात करू नका. मन सकारात्मक ठेवा. नजर सतत तुम्हाला हव्या असलेल्या संधीवर असू द्या व ती सापडली की पूर्ण क्षमतेने तिच्यावर तुटून पडा. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला स्वत: तुमच्या पायाशी लोळण घालावी लागेल, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
त्यांच्या या भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण केले. सभागृहात पाय ठेवायलाही जागा नसल्याने अनेकांनी तब्बल दोन तास हे प्रेरणादायी भाषण उभे राहून ऐकले.
बुरघाटे यांचे भाषण संपल्यावरही बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट सुुरू होता. तो या भाषणाच्या यशाची जणू फलश्रुतीच व्यक्त करीत होता.(प्रतिनिधी)