कॉपीच्या मदतीने पदवी

By admin | Published: May 19, 2017 02:32 AM2017-05-19T02:32:10+5:302017-05-19T02:32:10+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उन्हाळी सत्रात घेण्यात आलेल्या तीन टप्प्यातील परीक्षांमध्ये

Degree with the help of copy | कॉपीच्या मदतीने पदवी

कॉपीच्या मदतीने पदवी

Next

भरारी पथकाची कारवाई : १८०० कॉपीबहाद्दर पकडले, डीएसी करणार चौकशी
आशिष दुबे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उन्हाळी सत्रात घेण्यात आलेल्या तीन टप्प्यातील परीक्षांमध्ये एकूण १८०० कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या कॉपींचे प्रकरण पुढे आले आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर तैनात अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाने ही सर्व प्रकरणे परीक्षा अनुपालन समितीकडे (डीएसी) चौकशीसाठी पाठविली आहेत.
माहिती सूत्रानुसार विद्यापीठातील काही विभागाच्या अजूनही परीक्षा सुरूच आहेत. त्यामुळे या कॉपींच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाळी परीक्षेतील पहिला टप्पा हा ५ मार्चपासून सुरू झाला होता. या पहिल्या टप्प्यात पदविका अभ्यासक्रमासह हिवाळी परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या. यापैकी पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांमध्ये सर्वाधिक कॉपींची प्रकरणे पुढे आली. असे असले तरी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मात्र यावर चुप्पी साधली आहे. या विभागातील कुणीही बोलण्यास तयार नाही. जाणकारांच्या मते, पहिल्या टप्प्यापासूनच कॉपी सुरू झाली होती. ग्रामीण क्षेत्रासह शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी चालली. विद्यापीठाने अशा कॉपीबहाद्दरांना पकडण्यासाठी भरारी पथके सज्ज केली होती. परंतु परीक्षा केंद्र आणि त्यावरील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्या भरारी पथकांना सर्वांवर नजर ठेवणे शक्य नव्हते. शिवाय सुरुवातीच्या काळात भरारी पथकेसुद्धा नव्हती. त्याचा अनेकांनी फायदा घेतला. याच दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी चालत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भरारी पथके तयार करण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांदरम्यान मोठ्या प्रमाणात धाडी घालून ही कारवाई करण्यात आली. यातूनच परीक्षा केंद्रावर कॉपीच्या मदतीने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या खेळाचा भंडाफोड झाला.
यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या संख्येने कॉपीचे प्रकरण पुढे आले नाही.
यापूर्वी कोणत्याही परीक्षेत ५० पेक्षा अधिक प्रकरणे पुढे येत नव्हते. परंतु यावेळी ती संख्या १८०० वर पोहोचली आहे. यावर डीएसीचे सदस्यसुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

निकालांना ब्रेक
परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल रोखण्यात येणार आहे. डीएसीचा निकाल आल्यानंतर त्यांचे निकाल जाहीर केले जाईल. परंतु डीएसीचा निकाल कधी येणार, यावर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही.

भरारी पथकांची सक्रियता
यासंबंधी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावेळी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकरण पुढे आले असल्याचे मान्य केले. शिवाय त्यांनी भरारी पथकांच्या सक्रियतेमुळे हे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले.

सुनियोजित झाली कॉपी
माहिती सूत्रानुसार या सर्व परीक्षा केंद्रांवर सुनियोजितरीत्या कॉपी केली जात होती. नियमानुसार परीक्षा घेण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. परंतु केंद्रावर शिक्षकांऐवजी कॉलेजमधील विद्यार्थी आणि नुकतेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते. याशिवाय परीक्षा विभागाला या केंद्रांची चौकशी करण्याची कधी गरज वाटली नाही. त्यामुळे या सर्व केंद्रांवर खुलेआम कॉपीचा उपयोग झाला.

 

Web Title: Degree with the help of copy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.