पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:51+5:302021-06-06T04:06:51+5:30
नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार, या वर्षी नागपूर जिल्ह्यातील बारावीच्या ८५ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली आहे. परीक्षा ...
नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार, या वर्षी नागपूर जिल्ह्यातील बारावीच्या ८५ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने आता मूल्यमापन कोणत्या पद्धतीने होणार, वैद्यकीय, अभियांत्रिकीसह पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांपुढे उपस्थित झाला आहे. परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती, पण ती रद्द झाल्याने मुलांच्या भविष्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बारावीनंतर डीएड, एलएलबी, बीए, बीकॉम, बीएससी, डीएमएलटी, डी फार्म, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम, मुक्त विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम, इंजिनीअरिंग व वैद्यकीय अशा अनेक पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा प्रवेश निश्चित होतो. त्यामुळे नीट, जेईई, एमएचसीईटी अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आता होणार आहेत की नाही किंवा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याकरिता नेमके काय निकष राहणार आहे, कोणत्या निकषांवर पुढील अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे, जी परीक्षा दिलीच नाही, त्याच्या निकालावर पुढील प्रवेश होईल का, अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणपत्रिकेवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात आम्हाला प्रवेश मिळेल काय, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून होत आहे. विद्यार्थी वर्षभर बारावीनंतरच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याकरिता तयारी करीत असतो. आता परीक्षा रद्द झाल्याने केलेली पुढील पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमाची तयारी निरर्थक ठरेल की काही चीज होईल, हाही प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आल्यानंतर परीक्षा घेता आली असती, असाही काही विद्यार्थी पालक व शिक्षण तज्ज्ञांचा सूर आहे. बारावीनंतर पुढे काय, बारावीच्या गुणपत्रिकाला किती महत्त्व, बारावीची गुणपत्रिका आधीच्या गुणपत्रिकासारखी समतुल्य असेल का, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आधीसारखाच असेल का, आम्हाला कमीत लेखणार नाही ना, आमच्या गुणपत्रिकेला खरंच महत्त्व असणार की नाही, असेही अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्यामुळे परीक्षा रद्द, पण पुढील प्रवेश कसे, या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थी व पालकांची झोप निश्चित उडाली आहे.
- जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी - ८५,०००
- विद्यार्थी म्हणतात
परीक्षा मुलांच्या मनात भीती व ताण निर्माण करते, त्यात कोरोनाची दुहेरी साथ, या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा तणाव निर्माण झाला होता. या तणावातून आम्हा विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे, पण पुढे निकालाचे मूल्यांकन कसे केले जाईल, याचा प्रश्न आम्हाला पडलाय.
- साक्षी योगेश मेश्राम, विद्यार्थिनी
परीक्षा घेतली असती, तर चांगले झाले असते, पण वाढत्या कोरोनामुळे सरकारने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकरच जाहीर करून प्रक्रिया पूर्ण व्हावी.
मकरंद अंबागडे, विद्यार्थी
- पालक म्हणतात
करिअरच्या दृष्टीने बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. परीक्षा घेण्यासाठी आणखी थोडे दिवस थांबले असते, तर हरकत नव्हती.
विजय ठाकरे, पालक
परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न घेता, सरकारने परीक्षेचे पर्याय शोधायला हवे होते.
संगीता जायभाय, पालक
- काय म्हणतात शिक्षण तज्ज्ञ
वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याने, त्या ठिकाणी फारसा प्रश्न उद्भवणार नाही. परीक्षा रद्द झाल्याने विद्याशाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी मेरिट लावताना अडचण होणार आहे. त्यांचे प्रवेश कसे काय होतील, त्यांच्या प्रवेशासाठी कोणते निकष असतील, याबाबत संभ्रम आहे.
भाग्यश्री अणे, प्राचार्य, सी.पी. अँड बेरार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज
- बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली, हा निर्णय नक्कीच विवेकपूर्ण तथा स्वागत योग्य आहे. कदाचित, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बोर्ड परीक्षा परिणाम घोषित केले जातील, पण पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा अजून झालेला नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता गुणदान व प्रवेशप्रक्रियेमध्ये प्रामाणिकता व वैधता असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
प्रा.रिना देसाई, शिक्षण तज्ज्ञ
- निकाल शंभर टक्के लागणार असल्याने, सारख्या गुणांचे हजारो विद्यार्थी राहणार आहे. त्यामुळे कुणाला प्रवेश द्यावा व कुणाला नाकारावा, हा एक नवीन प्रश्न निर्माण होणार आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जावी.
अनिल शिवणकर, शिक्षण तज्ज्ञ