कॅगमधील कारवाईत विलंब झाल्यास खानापूर्तीला वाव : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:40 PM2019-12-21T22:40:11+5:302019-12-21T22:41:55+5:30
कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, कॅगने नगरविकास खात्यातील कामाशी संबंधित कामांमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवला आहे. ६५ हजार कोटी रुपयांची ही रक्कम आहे. कामांच्या पूर्ततेचे प्रमाणपत्र न देण्यामुळे गैरव्यवहार झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा प्रकरणात ऑडिटमध्ये चौकशीची प्रक्रिया आहे. तपास यंत्रणांकडून नोटिसा जातात. खरे तर गैरव्यवहाराला निमंत्रण देण्याची प्रक्रिया आहे. त्यात अवधी मिळाल्यास कागदपत्रे हुक करणे, जमाखर्चाची खोटी बिले सादर करणे, खोटा खर्च सादर करणे याची शक्यता असते. त्यामुळे तत्काळ कारवाई करण्याची गरज असते. असे झाले नाही तर प्रशासन किंवा विभागाची आपल्या यंत्रणेवर पकड नसल्याचा चुकीचा संदेश जनतेत जातो. त्यातूनच भ्रष्टाचार होतो, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
कॅगने ६५ हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण झाल्याची प्रमाणपत्रे दिली नसल्याने आक्षेप घेतला आहे. त्याच कामासाठी खर्च केला की नाही, हे तपासण्याची ती प्रक्रिया असते. रक्कम मोठी असेल तर गैरव्यवहाराची शक्यता असते. कालांतराने यंत्रणेला जनतेला विसर पडतो. कागदांची खानापूर्ती होईलही, माहितीची जुळवाजुळव होईल, अधिकारी यातून बाहेर जातील; मात्र जनतेच्या हिताची कामे यातून खरेच झाली की नाही, हे सांगता येणार नाही.
गुजरातमधील दंगली अधिकारातील लोकांकडूनच
गुजरातच्या दंगलींना विसरून चालणार नाही. ते दगड मारतील तर विट मारू, ही आठवण यावेळी भाजपाचे मंत्री करीत असतील तर ही एक धमकीच आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, गुजरातमधील दंगे अधिकारात बसणाऱ्या लोकांकडूनच करण्यात आले होते, ही बाब आता लपून राहिलेली नाही. कर्नाटकातही आता दंगली वाढल्या आहेत. तिथे अधिकारात बसलेली मंडळी गुजतारसारखीच विशिष्ट धर्माच्या विरोधात बसलेली मंडळी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.