मोफत शिवभोजन देण्याच्या कामातही दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:13 AM2021-05-05T04:13:09+5:302021-05-05T04:13:09+5:30
- मे महिन्यात दिले जाणार होते मोफत जेवण - लोकमत एक्सक्लुझिव्ह वसीम कुरैशी / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
- मे महिन्यात दिले जाणार होते मोफत जेवण
- लोकमत एक्सक्लुझिव्ह
वसीम कुरैशी / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाने नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या अर्थचक्रावरही आघात चढवला. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले मोठ्या संख्येने लोक कुटुंबाच्या भरणपोषणाच्या संकटाशी सामना करीत आहेत. ही स्थिती बघता, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पार्सल स्वरूपात मोफत शिवभोजन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, नागपूरसह राज्यभरात शिवभोजन केंद्रांची उणीव भासत आहे. त्यामुळे, नव्या केंद्रांसाठी निविदा प्रस्ताव मागविले होते. यातून केवळ पाच केंद्रांना मंजुरी मिळाली आहे आणि १५ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
नागपुरात सद्यस्थितीत १० केंद्रांवरून शिवभोजन दिले जात आहे. नव्या केंद्रांच्या प्रस्तावांना गांभीर्याने लवकर मंजुरी मिळाली असती, तर याच महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात २० नव्या केंद्रांतून गरजूंना भोजनाची सुविधा मिळणे सुरू झाले असते. नव्या केंद्रांबाबत प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शिवभोजनासाठी नव्या केंद्रांची यादी आली असून, नवे केंद्रांची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. अन्न पुरवठा विभागाच्या सूत्रांनुसार गरजूंना मोफत जेवण देण्याची सुविधा केवळ मे महिन्यासाठीच आहे. त्यातच नव्या केंद्रांच्या पडताळणीच्या कामात साधारणत: आठ ते दहा दिवस लागणार आहेत. याचा अर्थ अर्धा महिना लोटल्यानंतर पुढच्या १५ दिवसांसाठीच ही सुविधा आहे. एकूणच गरजूंनी मोफत जेवण देण्याच्या कामात टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच १५ प्रस्तावित केंद्रांना मंजुरी मिळाली नाही, ही आश्चर्याची बाब आहे. याबाबत जबाबदारी अधिकाऱ्यांकडूनही विशेष रस दाखविला जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच मोफत जेवणाची व्यवस्था असणारे हे केंद्र कधी सुरू होतील, याबाबत ते स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. मे महिन्यानंतर या केंद्रांतून १० रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याचे सांगितले जाते. यात शासनाकडून केंद्र संचालनकर्ता, बचत समूह, एनजीओ आदींना ४० रुपये प्रतिथाळी अनुदान दिले जाणार आहे.
---------------------
बॉक्स...
या पाच केंद्रांना मिळाली मंजुरी
- विजय लक्ष्मी हजारे, इंदाेरा
- ज्याेती रवींद्र गाेलाईत, तारकेश्वरनगर
- बेबी अशाेक गाैरीकर, जरीपटका
- नंदी पंधरे, धम्मदीपनगर
- नलिनी भगत (यादीत पत्ता प्रकाशित केलेला नाही)
----------
बॉक्स...
योजनेशी निगडीत तथ्य
- शिवभोजन थाळी योजना २६ जानेवारी २०२० पासून १० रुपये दराने सुरू झाली.
- मार्च २०२० मध्ये टाळेबंदीच्या काळात थाळीचे दर पाच रुपये करण्यात आले.
- एप्रिल २०२१ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रभाव बघता, ही सेवा पार्सलच्या स्वरूपात नि:शुल्क देण्याची घोषणा केली.
- वर्तमानात नागपूरमध्ये शिवभोजनाची १० केंद्रे आहेत. या केंद्रांतून शहरातील जवळपास अडीच हजार गरजूंना लाभ मिळतो आहे. परंतु, अन्य काही स्थळांवर विशेषत्वाने अतिरिक्त केंद्रांची गरज आहे.
............