विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात विलंब का?
By admin | Published: July 3, 2016 02:48 AM2016-07-03T02:48:27+5:302016-07-03T02:48:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निकाल लागूनदेखील सुमारे महिनाभरापासून गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा संतप्त सवाल : विविध मागण्यांसाठी नागपूर विद्यापीठावर मोर्चा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निकाल लागूनदेखील सुमारे महिनाभरापासून गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका देण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात आंदोलन केले. ‘लेझर’ प्रणालीमुळे गुणपत्रिकाचे काम रखडल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती हे विशेष.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे ४५० हून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. यात अंतिम वर्षांच्या निकालांचादेखील समावेश आहे. या विद्यार्थ्यांसाठी मूळ गुणपत्रिका फार महत्त्वाची असते परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप गुणपत्रिका लागलेल्याच नाही. या मुद्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व जोरदार आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंची भेट घेतली व इतका विलंब का होत आहे, असा संतप्त सवाल केला. याशिवाय २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश क्षमता ३० टक्क्यांनी वाढवावी, मनपा हद्दीतील महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यात यावे, परीक्षा सुरू होण्याच्या १५ दिवस अगोदर परीक्षा प्रवेशपत्र वितरित करण्यात यावे, माहिती केंद्राची स्थापना करावी यासारख्या विविध मागण्यादेखील पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी केल्या. केंद्रीय प्रवेश पद्धती, प्रवेश क्षमता वाढ यासाठी समिती गठित करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी यावेळी दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, सौरभ मिश्रा, ईश्वर बाळबुधे, महेंद्र भांगे, दिनकर वानखेडे, अॅड. पंकज डहाके यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जुन्या पद्धतीनेच गुणपत्रिका देणार
विद्यापीठाने ‘लेझर प्रिंटर’वर गुणपत्रिका छापण्याचे ठरविले होते. परंतु या प्रणालीत एक एक गुणपत्रिका ‘प्रिंट’ होते. त्यामुळे सगळ्या गुणपत्रिकांच्या ‘प्रिंटींग’ला विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पारंपरिक पद्धतीनेच ‘प्रिंटींग’ करण्यात येत आहे, असे कुलगुरू डॉ. काणे यांनी यावेळी स्पष्ट केले.