नागपूरच्या वाठोडा येथील बकरा मंडी हटवा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 07:41 PM2020-05-09T19:41:15+5:302020-05-09T19:45:03+5:30
वाठोडा ले-आउट परिसरात खुल्या जागेवर बकरा मंडी सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बकरा मंडीला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा ले-आउट परिसरात खुल्या जागेवर बकरा मंडी सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बकरा मंडीला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. आमदारांना आणि उपमहापौर यांना निवेदन देण्यात आले आहे. मनपा उपायुक्त यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बकरा मंडी बाजार लागू नये, अशी विनंती होती. त्यानंतरही बकरा मंडी सुरू करण्यात आली. परिसरातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता येथे बकरा मंडी सुरू करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनपातील राट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी दिला आहे.
भांडेवाडी परिसरात डंपिंग यार्ड, कत्तलखाना, कचºयापासून वीजनिर्मिती केंद्र, डॉग शेल्टर याच परिसरात आणले गेले. मोमिनपुरा- सतरंजीपुरा येथील लोकांना अलगीकरणासाठी सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. आता बकरा मंडी सुरू केली आहे. येथे संपूर्ण विदर्भातील तसेच हैदराबादपासून व्यापाऱ्यांची ये-जा सुरू झालेली आहे. पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी आली पण भांडेवाडी परिसराला व तेथील नागरिकांना त्याचा कोणताही फायदा झाला नाही. या परिसरातील लोक कोविड-१९ मुळे अद्यापही सावरले नाहीत. याचा विचार करता बकरा मंडी एपीएमसीमध्ये असलेल्या जागेवर सुरू करावी, अशी मागणी पेठे यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.