शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी हटवा
By admin | Published: December 16, 2014 01:06 AM2014-12-16T01:06:19+5:302014-12-16T01:06:19+5:30
माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवरील बंदी हटवावी, मागासवर्गीय अनुशेष, अनुकंपा योजनेची पदे भरण्यावरील बंदी मागे घ्यावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक
विधानभवनावर मोर्चा : अनुकंपा योजनेची पदे भरण्याची मागणी
नागपूर : माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवरील बंदी हटवावी, मागासवर्गीय अनुशेष, अनुकंपा योजनेची पदे भरण्यावरील बंदी मागे घ्यावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे विधानभवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे काढण्यात आलेला मोर्चा यशवंत स्टेडियम येथून निघाला. मोर्चा मुंजे चौक, आनंद टॉकीज, लोखंडी पूल, मानस चौक या मार्गाने निघाला. पोलिसांनी टेकडी रोडवर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात दोन हजारावर माध्यमिक शाळांमधील संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दिवसभर मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधले. सायंकाळी ६ वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोर्चा स्थळाला भेट दिली. त्यांनी संघटनेच्या मागण्या जाणून घेऊन त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
नेतृत्व
४वाल्मिक सुरासे, अविनाश चडगुलवार, शिवाजी खांडेकर
मागण्या
२३ आॅक्टोबर २०१३ चा सुधारित आकृतिबंध रद्द करून चिपळुणकर समितीनुसार त्वरित पदभरती सुरू करावी
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तत्काळ लागू करावा
प्रत्येक शाळेत पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक ही पदे भरावीत
राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना तत्काळ मान्यता द्यावी
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यांना शिक्षक पदावर विनाअट संवर्ग बदलून मिळावा तसेच वेतनात संरक्षण द्या