कोसळलेल्या स्लॅबचा मलबा हटविला
By admin | Published: January 17, 2016 02:55 AM2016-01-17T02:55:17+5:302016-01-17T02:55:17+5:30
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची स्लॅब कोसळून त्यात ठेकेदाराचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले.
कुणीही आढळले नाही : तिघांवर गुन्हे दाखल
मौदा : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची स्लॅब कोसळून त्यात ठेकेदाराचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. त्यानंतर स्लॅब हटविण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चालले. शनिवारी दुपारपर्यंत स्लॅबचा मलबा तेथून पूर्णत: हटविला. मात्र त्या मलब्यात काहीही आढळले नाही. त्यामुळे मलब्याखाली आणखी काही दबले असल्याची शक्यता मावळली. दरम्यान, स्लॅबखाली दबल्याने मृत्यू झालेल्या ठेकेदाराच्या पार्थिवावर शनिवारी मांगली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मौदा पोलिसांनी घरमालकासह कंत्राटदार आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मौदा-रामटेक मार्गावर डॉ. अनिल बोरकर यांच्या मालकीच्या जागेत मंगल कार्यालय इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना स्लॅब कोसळले. या घटनेत २२ जण जखमी झाले. तर मलब्याखाली काही मजूर दबून असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास इमारत बांधकामाचा ठेकेदार दिनकर डोरले (५०, रा. तेलीमांगली) याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेत जखमी झालेल्यांपैकी १७ मजुरांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून मेडिकलमध्ये पाठविले. तेथे त्यांच्यावर उपचार करून १६ मजुरांना सुटी देण्यात आली. सध्या वॉर्ड क्र. ७ मध्ये एक मजूर भरती असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
याप्रकरणी मौदा पोलिसांनी घरमालक डॉ. अनिल गजानन बोरकर (४३, रा. मौदा), मृत ठेकेदार दिनकर डोरले (५०, रा. तेलीमांगली) आणि अभियंता अमितोष देवीकार (३५, रा. सुंदरनगर, रायपूर छत्तीसगड) या तिघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४, ३०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास मौदा पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)
मलब्यात दबूनही
केला होता फोन
ही घटना घडताच मलब्याखाली दबल्या गेलेले दिनकर डोरले यांनी मलब्याखाली आपल्यासह दोन मजूर दबून असल्याबाबत त्यांच्या मोबाईलद्वारे त्यांच्या आप्तस्वकीयांना सूचित केले होते. त्यामुळे दिनकर हे मलब्याखाली दबले असले तरी सुरक्षित असल्याची सर्वांना खात्री झाली होती. मात्र रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मलब्याखालून बसलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेहच बाहेर निघाला.