दिल्लीच्या ठगबाजाची केंद्र सरकारकडून कंत्राट मिळवून देण्याची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 09:29 PM2018-07-10T21:29:42+5:302018-07-10T21:34:53+5:30
केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला.
रवी चंद्रशेखर वेखंडे (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते लक्ष्मीनगरात राहतात. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे कार्यालय आहे. ते कॉम्प्युटर, लॅपटॉपची विक्री आणि सेवा देतात. चार महिन्यांपूर्वी त्यांना आरोपी अंशुमन शास्त्री, प्रिन्स सर्व्हिसेस नवी दिल्ली यांच्याकडून संपर्क करण्यात आला. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञात विभागात कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सौभाग्य उजाला योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात एलईडी बल्बचा पुरवठा करायचा आहे, अशी माहिती दिली. त्यासंबंधाने लाखोंचे कत्रांट मिळवून देण्याचेही आमिष आरोपीने दाखवले. वेखंडे यांचा विश्वास बसावा म्हणून आरोपीने केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल केले. त्यातील मजकूर खरा असल्याचा गैरसमज झाल्याने वेखंडे यांनी आरोपी अंशुमन शास्त्रीने सांगितल्याप्रमाणे त्याला तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. हे झाल्यानंतर आरोपीने प्रकल्प मिळवून देण्याची बतावणी केली. परंतु नंतर तो टाळाटाळ करू लागला. तब्बल चार महिने त्याने टाळल्याने वेखंडे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशीअंती सोमवारी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.