मराठी पक्षाला संपविण्याच्या कटात दिल्लीचा अदृष्य हात; सुप्रिया सुळेंचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल
By मंगेश व्यवहारे | Published: October 1, 2023 09:08 PM2023-10-01T21:08:55+5:302023-10-01T21:10:25+5:30
उपमुख्यमंत्र्यांनाही लगावले टोले.
मंगेश व्यवहारे, नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसाला जवळ करून शुन्यातून शिवसेना उभी केली. शरदचंद्र पवारांनीही राष्ट्रवादीची स्थापना करून महाराष्ट्रात मराठी मानसाला क्षमतेपेक्षा जास्त बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील या मराठी मानसांच्या पक्षांना संपविण्याच्या कटात दिल्लीचा अदृष्य हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
त्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून, नागपुरात पक्षाचा मेळावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी याच अदृष्य हाताने एका मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री आणि हाफ मुख्यमंत्री बनविल्यावरून देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. त्या पुढे म्हणाल्या की भाजपाचे केंद्रीय नेतृत्वाने आयसीई (इनकम टॅक्स, सीबीआय व ईडी) चा वापर करून या देशातील कुटुंब तोडण्याचे काम केले आहे. आयसीईचा वापर ९५ टक्के विरोधकांवर केला आहे. हे विरोधक जेव्हा भाजप नावाच्या वॉशिंगमशीनमध्ये जातात तेव्हा त्यांच्यावरील आरोप धुवून निघतात, अशाही त्या म्हणाल्या.
- पटेलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह
विदर्भात राष्ट्रवादीचा मोठा नेता असतानाही गेल्या १० वर्षात राष्ट्रवादीचा विदर्भात अपेक्षित परफॉर्मेन्स राहिला नाही. भंडारा आणि गोंदियात पक्षाची अपेक्षित ताकद वाढली नाही. विदर्भाचा आढावा घेताना जे गेले त्यांचा विचार राष्ट्रवादी करीत नाही. नवे टॅलेंट नवे नेतृत्व उभारू असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
- ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वाघ नखांना महत्त्व
महाराष्ट्रात आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वाघ नखांना महत्त्व दिले जात आहे, अशी टीका सुळे यांनी राज्य सरकारवर केली. इतिहासतज्ञानी ज्याप्रमाणे वाघनाखाबाबत भूमिका मांडली आहे त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे.
- चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही
राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे देशातील लहान मुलांनासुद्धा माहीत आहे. पक्ष शरद पवार यांनी बांधला आहे. मग चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.