दिल्ली जगात सर्वाधिक प्रदूषित शहर , मुंबई-काेलकाताही यादीत; फुफ्फुसासह मेंदू आणि हृदयावरही परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 05:40 AM2023-11-06T05:40:57+5:302023-11-06T05:41:18+5:30
रविवारी ४८३ च्या एक्यूआयसह नवी दिल्ली पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे.
नवी दिल्ली : हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीमध्ये राहिल्याने नवी दिल्ली विषारी धुक्याने वेढली गेली आहे. स्वीत्झर्लंडच्या ‘आयक्यूएअर’च्या आकडेवारीनुसार कोलकाता, मुंबईसह भारताची राजधानी जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक ठरली.
रविवारी ४८३ च्या एक्यूआयसह नवी दिल्ली पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांवरच नाही तर सर्व वयोगटातील लोकांच्या हृदय आणि मेंदूसारख्या इतर प्रमुख अवयवांवर देखील परिणाम होतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
नागरिकांना काय होतोय त्रास?
कमी तापमान आणि शेजारील राज्यांमध्ये शेतीचा काडीकचरा जाळण्यामुळे हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. नवी दिल्लीच्या २ कोटी रहिवाशांपैकी अनेकांनी डोळ्यात जळजळ होण्याची आणि घशात खाज येण्याची तक्रार केली.
वायू प्रदूषणाचा गर्भावर विपरित परिणाम...
हवेची गुणवत्ता गंभीर राहिल्याने, तज्ज्ञांनी मोठ्या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीचा इशारा देताना गर्भावर दुष्परिणाम होण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील एका हॉस्पिटलचे वरिष्ठ फुफ्फुस विशेषज्ञ डॉ. अरविंद कुमार यांच्या मते, वायू प्रदूषणावर ‘एअर प्युरिफायर’ हा उपाय नाही. जेव्हा गर्भवती महिला श्वास घेते तेव्हा विषारी वायू तिच्या फुफ्फुसात जातो; फुफ्फुसातून तो रक्तात जातो आणि प्लेसेंटाद्वारे गर्भापर्यंत पोहोचतो आणि त्यांच्यावर वाईट परिणाम करताे.”
प्राथमिक शाळा बंदच राहणार
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. सहावी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
घरून काम करा
वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने प्रदूषणाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारी आणि खासगी कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी घरून
काम करावे, अशी सूचना दिली आहे.