धनगर समाजाबाबतच्या पत्रावरून जाणुनबुजून राजकारण - चंद्रशेखर बावनकुळे
By योगेश पांडे | Updated: September 20, 2023 18:18 IST2023-09-20T18:17:32+5:302023-09-20T18:18:36+5:30
महिला आरक्षण विधेयकामुळे कॉंग्रेस बॅकफुटवर

धनगर समाजाबाबतच्या पत्रावरून जाणुनबुजून राजकारण - चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : धनगर समाजाबाबतच्या पत्रावरून विरोधकांकडून जाणुनबुजून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला आहे. धनगर समाजाची विविध आंदोलने सुरू असून, त्यांच्या समस्या घेऊन प्रदेश चिटणीस नवनाथ पडळकर व राम वडकुते माझ्याकडे आले होते. धनगर समाजाच्या मागण्या व समस्या सरकारकडे पाठविल्या. तेवढाच त्या पत्राचा अर्थ असून त्यापेक्षा अधिक नाही, असा दावा त्यांनी केला. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संबंधित पत्राला सोशल मीडियावर प्रसारित करून त्याचा अपप्रचार सुरू असल्याच्या प्रकार चुकीचा आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे कॉंग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे त्यांचे नेते काहीतरी बोलत सुटले आहेत. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये एकमेकांपेक्षा अधिक जलद कोण बोलू शकतो याविषयीच स्पर्धा लागली आहे. सुरुवातील कोण बोलते हे त्यांना कॉंग्रेसच्या दिल्ली दरबारी दाखवायचे आहे. त्यातूनच ते वाट्टेल ते आरोप लावत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मराठी मतदारांवर डोळा असल्याचादेखील आरोप लावला. पांढुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याचे अनावरण आदित्य ठाकरेंच्या हस्ते करून ते केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील सौंसर येथील शिवाजी महाराजांचा पुतळा का पाडला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंकडून विरोधकांना डीपीसीचा निधी नाही
उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीचा निधी विरोधी पक्षातील आमदार व लोकप्रतिनिधींना मिळू नये असा अलिखित आदेश काढला होता. त्यांनी आकसापोटी राजकारण केले. आता ते लोक निधीवाटपावर बोलत आहेत त्यांनी स्वत:कडे बघावे, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.