शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे सेवा पोहोचवा - विजयलक्ष्मी बिदरी
By आनंद डेकाटे | Published: October 4, 2023 04:21 PM2023-10-04T16:21:03+5:302023-10-04T16:27:03+5:30
प्रशासकीय सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २५० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
नागपूर : शेवटच्या लोकांपर्यंत प्रशासन पोहोचविण्यासाठी पारदर्शकतेने व प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी शासनाच्या सेवेत नव्याने राजपत्रित अधिकारी म्हणून रूजू होत असलेल्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना दिला.
वनामती येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्घाटन बिदरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी वनामतीच्या संचालक मिताली सेठी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव लीना सांख्ये, कक्ष अधिकारी सुनिल निकम, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत राजपत्रित अधिकाऱ्यांसाठीच्या (वर्ग-दोन) नवव्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राला सुरूवात झाली असून याअंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या २५० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १०४ आठवड्यांचे असून समाजमन व सामाजिक जाणिवा प्रगल्भ करतांनाच गतीमान प्रशासनासाठीच्या विविध विषयाच्या अभ्याससत्राचा समावेश यात करण्यात आला आहे.
प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश करतांना प्रशासन म्हणून लोकांची सेवा करायची आहे. त्या अनुषंगाने शेवटच्या मानसापर्यंत प्रशासन पोहचविण्याची जबाबदारी पूर्ण करायची असल्याचे सांगतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या, प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम करा, उत्तम सेवा देतांनाच जनतेसाठी सदैव उपलब्ध राहून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होईल, यासाठी पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून द्या. प्रशासकीय सेवेची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे ही भावना समोर ठेवून काम करण्याचा सल्लाही बिदरी यांनी दिला. प्रास्ताविकात प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे यांनी केले. संचालन प्रा. किशोर वाघमारे यांनी केले तर इंदिरा वाघ यांनी केले.
- महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन वसतिगृह
प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन बांधण्यात आलेल्या ‘वनलता’ या वसतीगृहाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, संचालक मिताली सेठी, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे, सहायक संचालक डॉ. विद्या मानकर उपस्थित होते.