देशाच्या तळागाळापर्यंत नवीन शैक्षणिक धोरण पोहोचवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 07:00 AM2022-01-08T07:00:00+5:302022-01-08T07:00:13+5:30

Nagpur News देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी आग्रह करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता याच्या अंमलबजावणीसाठी देखील पुढाकार घेण्यात येणार आहे.

Deliver new education policy to the grassroots of the country; Role of Rashtriya Swayamsevak Sangh | देशाच्या तळागाळापर्यंत नवीन शैक्षणिक धोरण पोहोचवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

देशाच्या तळागाळापर्यंत नवीन शैक्षणिक धोरण पोहोचवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्दे९५ टक्के दैनिक शाखांना सुरुवात

योगेश पांडे

नागपूर : देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी आग्रह करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता याच्या अंमलबजावणीसाठी देखील पुढाकार घेण्यात येणार आहे. तेलंगणात सुरू असलेल्या राष्ट्रीय समन्वय बैठकीदरम्यान शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघ परिवारातील संघटनांकडून आढावा घेण्यात आला. शैक्षणिक धोरण देशात तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना देण्यात आली.

दरवर्षी सप्टेंबर व जानेवारी महिन्यात संघाची समन्वय बैठक होत असते. या बैठकीदरम्यान कुठलाही धोरणात्मक निर्णय होत नसतो. केवळ विविध कार्यांचा आढावा व त्यादृष्टीने सूचना देण्यात येतात. यंदाच्या बैठकीला भाजप, अभाविप, शिक्षण मंडळ, विहिंप यांच्यासह ३६ संघटनांचे दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात शैक्षणिक धोरण, सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, परिवार प्रबोधन या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात भाजपच्या कार्याचा देखील आढावा घेण्यात आला. विशेषत: उत्तर प्रदेश व इतर राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील संघटन व नियोजनाबाबत भाजपकडून माहिती घेण्यात आली.

शाखांमधील ६० टक्के स्वयंसेवक विद्यार्थी

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर संघाच्या शाखा बंद करण्यात आल्या होत्या; परंतु दुसऱ्या लाटेनंतर शाखा सुरू झाल्या. ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत २०२१ च्या अखेरीस ९३ टक्के ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली व ९५ टक्के दैनिक शाखादेखील सुरू झाल्या. सोबतच देशभरातील ९८ टक्के साप्ताहिक मिलन व ९७ टक्के मासिक शाखादेखील सुरू झाल्या. सद्य:स्थितीत देशात ५५ हजार नियमित शाखा सुरू असून त्यातील ६० टक्के स्वयंसेवक हे विद्यार्थी किंवा तरुण आहेत, अशी माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली.

विस्मृतीत गेलेल्या २५० स्वातंत्र्यसेनानींसाठी जागर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी संघातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेल्या व विस्मृतीत गेलेल्या २५० स्वातंत्र्यसेनानींचा लढा समाजासमोर आणण्यात येणार आहे. शिवाय संस्कार भारतीच्या माध्यमातून ७५ नाट्यकलाकृतींतून स्वातंत्र्याचा इतिहास व संघर्ष नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येईल.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीरच

सर्वोच्च पदाच्या व्यक्तीच्या सुरक्षेत झालेली त्रुटी ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहेच. त्यातून तथ्य समोर येईल व दोषींवर आवश्यक ती कारवाई सरकारकडून केली जाईल हा विश्वास आहे, असे मत डॉ.मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.

Web Title: Deliver new education policy to the grassroots of the country; Role of Rashtriya Swayamsevak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.