गाव-खेड्यातही प्रसूतीच्या शस्त्रक्रिया

By admin | Published: February 20, 2017 02:23 AM2017-02-20T02:23:00+5:302017-02-20T02:23:00+5:30

गाव खेड्यातच प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Delivering surgery in village-village | गाव-खेड्यातही प्रसूतीच्या शस्त्रक्रिया

गाव-खेड्यातही प्रसूतीच्या शस्त्रक्रिया

Next

खासगी डॉक्टरांची घेणार मदत : प्रति शस्त्रक्रियेला पाच हजार रुपयापर्यंतचे मानधन
सुमेध वाघमारे नागपूर
गाव खेड्यातच प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने आता खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रति शस्त्रक्रियामागे स्त्री रोग तज्ज्ञाला पाच हजार, भूलतज्ज्ञाला तीन हजार तर बालरोग तज्ज्ञाला हजार रुपये दिले जाणार आहे. मात्र तूर्तास तरी या योजनेला खासगी डॉक्टरांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
विविध विषयातील स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरांना गाव-खेड्यात आपली सेवा देण्यास ‘अ‍ॅलर्जी’ आहे. परिणामी, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बिकट होत चालली आहे. शासनाने महिलांसाठी जननी सुरक्षा योजना सुरू केली. परंतु, स्त्री रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ नसल्याने प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना वेदना सहन करीत नागपूर गाठावे लागत आहे. नागपूर मंडळातील आरोग्य संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये विविध स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरांच्या ३७३ पदांना मंजुरी प्राप्त असताना १३५ पदेच भरण्यात आली आहेत. तब्बल २३८ पदे रिक्त आहेत. यातही बालरोगतज्ज्ञाची ५७ पदे, स्त्रीरोगतज्ज्ञांची ६२ पदे तर भूलतज्ज्ञाची ६७ पदे रिक्त आहेत. शासन ही पदे भरण्यासाठी वेळोवेळी जाहिरात करते, परंतु विशेषज्ञ ग्रामीण भागात जायलाच तयार नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून शासनाने खासगी डॉक्टरांकडून सेवा घेण्याचे ठरविले आहे. यासाठी ‘मानधना’ला हाताशी धरले आहे. ज्या आरोग्य संस्थांमध्ये स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञाचे पद रिक्त असेल तिथे या खासगी विशेषज्ञाची सेवा उपलब्ध करून घेण्यात याव्यात, अशा सूचना उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. यात जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्र्थींच्या प्रसूतीसाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यास स्त्रीरोग तज्ज्ञाने सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रति शस्त्रक्रिया मागे पाच हजार रुपये, भूलतज्ज्ञाना तीन हजार रुपये तर बालरोग तज्ज्ञाना एक हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

खासगी डॉक्टरांनी याचा लाभ घ्यावा
जिथे स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ नाहीत तिथे या खासगी विशेषज्ञांकडून सेवा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात आकर्षक मानधन दिले जात असल्याने प्रतिसाद मिळत आहे. परंतु खासगी डॉक्टरांनी यात आणखी समोर यायला हवे. ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त लाभही मिळेल आणि अडचणीत सापडलेल्या गावखेड्यातील रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्याचे समाधानही मिळेल.
-डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग

Web Title: Delivering surgery in village-village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.