डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:33 AM2019-05-19T00:33:40+5:302019-05-19T00:35:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ऑनलाईन खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या डिलेव्हरी बॉयची आरोग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ऑनलाईन खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी बंधनकारक केली आहे. ही तपासणी शासकीय वा खासगी रुग्णालयात करता येईल. यासंदर्भात विभागाने झोमॅटो, स्वीगी, उबेर इट्स या कंपन्यांना पत्र पाठविल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन डिलेव्हरीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी लागणारे वेटिंग पाहता लोकांनाही ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्याला पसंती दिली आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एफडीएने डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी बंधनकारक केली आहे. फूड डिलेव्हरी बॉयला कुठला आजार किंवा संसर्गजन्य आजार आहे वा नाही, हे तपासण्याची यंत्रणा एफडीएकडे नाही. त्यामुळे हॉटेल ते थेट ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी ज्या डिलेव्हरी बॉयवर आहे, त्याच्या आरोग्य तपासणीचे आदेश नागपूरच्या एफडीए विभागाने दिले आहेत.
धावपळीच्या काळात ग्राहकांकडून ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून ऑर्डर मिळाल्यानंतर ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी फूड डिलेव्हरी बॉयची आहे. ग्राहकांना त्यांचा पत्ता पाहून त्या त्या परिसरातील हॉटेलमधून डिलेव्हरी बॉयच्या माध्यमातून खाद्यपदार्थ पोहोचविण्यात येते. खाद्यपदार्थ पॅकिंगमध्ये असले तरीही डिलेव्हरी बॉय हॉटेलमधून पॅकिंग घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवून देईपर्यंत स्वत: हाताळतो. डिलेव्हरी बॉय हा हॉटेल आणि ग्राहकांमधील मोठा दुवा आहे. तो वैद्यकीयरीत्या फिट असावा, यावर एफडीए आग्रही आहे.
ऑनलाईन खाद्यापदार्थ मागविण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. लहानांपासून वयस्कांपर्यंत सर्वांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. ग्राहकांना शुद्ध आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावे, या दृष्टिकोनातून एफडीएने कंपन्यांना पत्र पाठवून डिलेव्हरी बॉयच्या आरोग्य तपासणीवर भर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका डिलेव्हरी बॉयने सांगितले की, एफडीएचे आदेश आम्हाला मान्य आहे. पण तपासणीचा खर्च कंपनी वा कंत्राटदाराने करावा. या व्यवसायात युवक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.
प्रमाणपत्र एफडीएकडे जमा करणे अनिवार्य
ऑनलाईन खाद्यपदार्थांची डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्या झोमॅटो, स्वीगी, उबेर इट्स यांना पत्र दिले आहे. या कंपन्यांनी खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांकडे असलेल्या डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी करायची आहे. तपासणी केल्याचे प्रमाणपत्र एफडीएकडे जमा करणे अनिवार्य आहे. यामुळे लोकांना पोषक खाद्यान्न मिळेल.
मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)
अन्न व औषधी प्रशासन विभाग.