दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’, आरोपीला अटक
By योगेश पांडे | Published: January 3, 2024 05:27 PM2024-01-03T17:27:12+5:302024-01-03T17:28:14+5:30
दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
योगेश पांडे, नागपूर : दुचाकीवरून नायलॉन मांजाची ‘डिलिव्हरी’ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना अमन नावाचा व्यक्ती मोटारसायकलवरून मांजा विकत असून तो जुनी शुक्रवारी मार्गाने भोला गणेश चौकात जाणार असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी पावणे दहा वाजताच्या सुमारासा सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने अमन कुंदन नरहरे (२२, जुनी शुक्रवारी, कोतवाली) असे नाव सांगितले. त्याच्या मोटारसायकलवर एक पोते होते. त्याची झडती घेतली असता त्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचे ३१ बंडल आढळले. त्याने संबंधित मांजा हार्दिक केसरवानी (३५, जुनी शुक्रवारी) याच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून मांजा व मोटारसायलकल असा १.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला कोतवाली पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, वैभव बारंगे, नाझीर शेख, पुरुषोत्तम जगनाडे, आशीष क्षीरसागर, महेश काटवले, स्वप्नील अमृतकर, सत्येंद्र यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.