‘डेल्टा प्लस’चा अंदाज खोटा ठरला ! ‘डेल्टा’च अधिक धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 11:59 AM2021-08-13T11:59:53+5:302021-08-13T12:00:14+5:30
Nagpur News ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने ‘विषाणूचा चिंताजनक प्रकार’ घोषित केले आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने ‘विषाणूचा चिंताजनक प्रकार’ घोषित केले आहे. परंतु राज्यात आढळून येत असलेले याचे रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा विचार केला असता या विषाणूचा प्रकाराबाबतचा अंदाज खोट ठरला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तज्ज्ञाच्या मते, या विषाणूचा आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच आता डेल्टा प्लस कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ असण्याची शक्यता बोलली जात आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांचा अहवाल एक महिन्यानंतर आता प्राप्त झाला आहे. बहुसंख्य रुग्ण ठणठणीत झाले आहेत. यामुळे विषाणूच्या या प्रकाराबाबत चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-विदर्भातील चारही रुग्णांकडून संसर्ग नाही
विदर्भात आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या चारही रुग्णांकडून संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व सालेकसा तालुक्यात व अकोला जिल्ह्यामध्ये आढळून आलेला ‘डेल्टा प्लस’चा रुग्णाला सौम्य लक्षणे होती. या तिन्ही रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतला. हे तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘डेल्टा प्लस’चा रुग्णाला मध्यम लक्षणे होती. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आठवड्याचा उपचारानंतरच रुग्ण बरा झाला. हे सर्व रुग्ण जून महिन्यातील आहेत. या चारही रुग्णांकडून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्या कुटुंबाचा सदस्यांचे नमुने ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी पाठविले जाणार आहे.
-कोरोना विषाणूचा बदलेला प्रकार
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अत्यंत संक्रामक प्रकार ‘बी .१.६१७.२’ने कहर केला होता. याला ‘डेल्टा’ नाव दिले आहे. आता हा ‘ए व्हाय.१’ या ‘डेल्टा प्लस’मध्ये बदललेला आहे. ‘डेल्टा’पेक्षा ‘डेल्टा प्लस’ हा वेगाने पसरतो, यावर ‘मोनोक्लोनल अँटिबॉडी’ उपचाराद्वारेदेखील नियंत्रित केले जाऊ शकत नाही, असे बोलले जात होते. परंतु आता पुन्हा यावर विचार केला जात आहे.
-‘डेल्टा’चा तुलनेत ‘डेल्टा प्लस’ कमी धोकादायक
, ‘डेल्टा’च्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’ हा कमी धोकादायक आहे. तसा ‘डाटा’ ‘आयसीएमआर’कडे उपलब्ध आहे. आतापर्यंत जे रुग्ण ‘डेल्टा प्लस’ने बाधित झाले त्यांच्याकडील माहितीवरून ‘डेल्टा’पेक्षा हा कमी संसर्गाचा असल्याचे पुढे आले आहे. यामुळे ‘डेल्टा प्लस’ला घाबरण्याचे कारण नाही. नवे ‘व्हेरियंट’ येतच राहणार आहे. यावर लसीकरणासोबतच ‘जिनोम सिक्वेसिंग’ करीत अभ्यास सुरू ठेवणे हाच उपाय आहे.
-डॉ. नितीन शिंदे, संसर्गजन्य आजारतज्ज्ञ