अटलांटा कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:48+5:302021-02-10T04:09:48+5:30
कोंढाळी : कोंढाळी-नागपूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या अटलांटा (बालाजी) कंपनीच्या मनमानी कारभाराने या मार्गावर झालेल्या अपघातात आजवर अनेकांचे जीव ...
कोंढाळी : कोंढाळी-नागपूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या अटलांटा (बालाजी) कंपनीच्या मनमानी कारभाराने या मार्गावर झालेल्या अपघातात आजवर अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अटलांटा कंपनीविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी कोंढाळी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. कोंढाळी ते नागपूर(वाडी)दरम्यान नागपूर-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अटलांटा( बालाजी)कंपनीने केले आहे. या कंपनीकडून गत १० वर्षांपासून या मार्गावर टोल वसुली करण्यात आली. पण कोंढाळी-नागपूरदरम्यान सर्व्हिस मार्ग, ड्रेनेज, साईड शोल्डर आदी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत. कोंढाळी येथील वर्धा रोड टी-पाॅईंटवर नेहमी अपघात होतात. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात २२ डिसेंबर २०१७ विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी अटलांटा कंपनीने वर्धा रोड टी-पाॅईंटवर मोठे हायमास्ट लाईट व गतिरोधक लावून देण्याचे आणि टी-पाॅईंटचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात कंपनीने येथे केवळ गतिरोधक लावले. वर्धा रोड टी-पाॅईंट येथे मरामाय मंदिरासमोर अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. येथील रस्ता अरुंद आहे. याबाबत कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास यांनी अटलांटा कंपनी प्रशासनाला अनेक तक्रारी, निवेदन दिले. मात्र याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. या तक्रारीची दखल घेत कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी या मार्गाची पाहणी केली. यावेळी सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, ग्रा.पं. सदस्य संजय राऊत, कमलेश गुप्ता आदी उपस्थित होते.