‘टॉकीज चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील’ म्हणून खंडणीची मागणी; चार आरोपींना अटक
By दयानंद पाईकराव | Published: February 14, 2024 04:52 PM2024-02-14T16:52:15+5:302024-02-14T16:53:00+5:30
टॉकीजच्या मॅनेजरला मारहाण करून केली तोडफोड
नागपूर : ‘टॉकीज चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील’ असे म्हणून चार आरोपींनी राजविलास सिनेमा टॉकीजच्या मॅनेजरला मारहाण करून टॉकीजमधील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
ललित अजय भामोळे (२५, रा. जुनी शुक्रवारी), करण भुपेंद्र कांबळे (१९, रा. पिवळी मारबत चौक), निहाल संजय शेंद्रे (२०, रा. टेलिफोननगर दिघोरी घाटाजवळ) आणि विशाल लक्ष्मण जागरे (३०, रा. ज्ञानेश्वर मंदिरासमोर जुनी मंगळवारी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ललित श्रीराम गावंडे (३२, रा. कावरापेठ, नामदेवनगर, रेल्वे क्रॉसींगजवळ यशोधरानगर) असे मारहाण करण्यात आलेल्या टॉकीजच्या मॅनेजरचे नाव आहे. गावंडे हे कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजविलास सिनेमा टॉकीजचे मॅनेजर आहेत.
सोमवारी १२ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजता आरोपी संगणमत करून टॉकीजमध्ये आले. त्यांनी मॅनेजर गावंडे यांना ‘टॉकीज चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील’ असे बोलून त्यांना शिविगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच टॉकीजमधील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३८४, ३२३, ५०४, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.