पोलिसांमध्ये तक्रार दिली म्हणून पाणीपुरीचालकाला खंडणीची मागणी
By योगेश पांडे | Published: June 12, 2023 04:56 PM2023-06-12T16:56:11+5:302023-06-12T16:57:01+5:30
शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
नागपूर : एका महिन्याअगोदर पोलिसांत तक्रार दिल्याने दीड लाखांचा खर्च झाला. तो पैसा परत दे असा तगादा लावत एका गुन्हेगाराने पाणीपुरीच्या दुकानदाराला खंडणीची मागणी केली. तसेच त्याला जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अमोल उर्फ प्रलय उर्फ परत्या सिद्धार्थ मेश्राम (३०, अंगुलीमालनगर) असे आरोपीचे नाव आहे. मिसाळ ले आऊट येथे दिनेश रामस्वरूप गुप्ता (४६, कपिलनगर) यांचे पाणीपुरीचे दुकान आहे. महिन्याभराअगोदर गुप्ता यांनी अमोलविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.
रविवारी रात्री साडेसात नंतर आरोपी अमोल त्यांच्या दुकानात आला व माझ्याविरोधात एक महिन्याअगोदर तू पोलिसांत तक्रार केली होती व त्यात दीड लाख रुपये खर्च झाले. ते पैसे मला दे आणि दर महिन्याला मला खंडणीदेखील द्यावी लागेल, असे अमोल म्हणाला. त्यानंतर त्याने गुप्ता यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. गुप्ता यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अमोलविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.