लालपरीची डिमांड वाढली, गर्दीमुळे सुगीचे दिवस; एसटीची तिजोरी खच्चून भरण्याचे संकेत
By नरेश डोंगरे | Published: October 13, 2022 08:53 PM2022-10-13T20:53:57+5:302022-10-13T20:54:43+5:30
एसटी बस दूर दूरवर असलेल्या आतमधील खेड्यापाड्यांपर्यंत जाते अन् तेथील प्रवाशांची ने-आण करते. त्यामुळे अलीकडच्या तीन वर्षांपूर्वीपर्यंत एसटीत प्रवाशांची मोठी गर्दी असायची. मात्र, कोरोनामुळे ही गर्दी कमी झाली. एसटीला प्रवासी मिळेनासे झाले.
नागपूर : सणासुदीचे दिवस आणि खरेदीदारांची लगबग यामुळे लालपरीची डिमांड चांगलीच वाढली आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये आता पूर्वीप्रमाणेच गर्दी वाढली आहे. ही गर्दी लक्षात घेता या महिन्यात एसटीची तिजोरी चांगलीच भरण्याचे संकेत मिळाले आहेत.
एसटी बस दूर दूरवर असलेल्या आतमधील खेड्यापाड्यांपर्यंत जाते अन् तेथील प्रवाशांची ने-आण करते. त्यामुळे अलीकडच्या तीन वर्षांपूर्वीपर्यंत एसटीत प्रवाशांची मोठी गर्दी असायची. मात्र, कोरोनामुळे ही गर्दी कमी झाली. एसटीला प्रवासी मिळेनासे झाले. कोरोनानंतर अटी-शर्तीमुळेही एसटी बसमधील प्रवाशांची संख्या सो-सोच होती. त्यातून कशीबशी वाटचाल करणाऱ्या एसटीला नंतर संपाने फटका दिला. कर्मचारी रुसून बसल्याने एसटीची चाके जागच्या जागी रुतली. संप एकदाचा संपला अन् एसटीची धावपळ सुरू झाली. प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एसटी आता नव्या जोमाने धावत आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात एसटीच्या नागपूर विभागाने १२ कोटी १७ लाख, तर सप्टेंबर महिन्यात ११ कोटी, ८७ लाखांचे उत्पन्न मिळवले. आता या दोन्ही महिन्यांच्या तुलनेत प्रवाशांची गर्दी जवळपास दुप्पट झाल्याने सुरू असलेल्या ऑक्टोबर महिन्यात एसटीचे मासिक उत्पन्न २० ते २२ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता अधिकारी वर्तवीत आहेत.
१ लाख, १३ हजार ज्येष्ठांचा प्रवास -
एसटीकडून वेगवेगळ्या कॅटेगिरीतील प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. कुणाला ५० टक्के तर अमृत महोत्सव योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना चक्क मोफत प्रवास करविला जातो. त्यामुळे ज्येष्ठांचा उत्साह एसटी बसमध्ये अनुभवायला मिळत आहे. या योजनेमुळे नागपूर विभागात १ लाख, १३ हजार ज्येष्ठांनी प्रवास केला, हे विशेष !