उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने टूर पॅकेजची डिमांड वाढली, हिल स्टेशनला जास्त पसंती!
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 5, 2024 11:22 PM2024-05-05T23:22:15+5:302024-05-05T23:22:27+5:30
पर्यटकांना हव्यात लक्झरियस सुविधा
मोरेश्वर मानापुरे. नागपूर : उन्हाळी सुट्ट्या (एप्रिल-जून) हा सहसा प्रवाशांसाठी पीक सीझन असतो. उन्हाळ्यात सुट्ट्यांच्या दिवसात स्वस्त आणि छोट्या पॅकेजसह देशात पूर्व, उत्तर आणि दक्षिण भारतात टूर पॅकेजला मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात विदर्भातून जवळपास ५ हजारांहून अधिक पर्यटक देश-विदेशात जास्त असल्याने हा व्यवसाय कोट्यावधींवर पोहोचला आहे. कोरोनानंतर पर्यटन क्षेत्र विस्तारल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
भारतीयांना पर्यटनासाठी उन्हाळी हंगाम पसंतीचा आहे. वाढत्या गर्मीमुळे ‘वन नाईट स्टे’ या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये २५० ते ३५० किमी अंतरावरील पर्यटन ठिकाणाचा समावेश आहे. मागणीनुसार टूर ऑपरेटर्सचे छोटे पॅकेज तयार आहेत. काही दोन ते तीन दिवसांचे असून या दिवसात आनंद लुटण्याचे सर्वांचे नियोजन आहे. विकेंड जंगल सफारीमध्ये कान्हा, कऱ्हांडला, ताडोबा, चिखलदरा, पचमढीची मागणी वाढली आहे. लोक अशा पॅकेजला कुटुंबीयांसह फिरण्याला जास्त महत्त्व देत असल्याचे टूर ऑफरेटर्सचे मत आहे. पर्यटकांची मागणी वाढल्याने छोट्या बसेस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावत आहेत. भाडेही वाढले आहे.
खासगी वाहनांनी पर्यटन
दोन ते तीन दिवस बाहेर फिरण्यासाठी अनेकांची खासगी वाहनांना जास्त पसंती आहे. तर फ्लॅट्स वा नातेवाईकांच्या समुहाची १७ ते २६ सीट बसेसला मागणी आहे. एकाच दिवसात पर्यटन करून घरी परत येणारे अनेक ग्रुप आहेत. त्यांची रावणवाडी, घोघरा महादेव, कुंवारा भीमसेन, रामटेक या ठिकाणांवर विकेंडला गर्दी होत आहे.
पूर्व-उत्तर-दक्षिण भारतातील ठिकाणांना पसंती
उन्हाळ्यात भारतात श्रीनगर, जम्मू-काश्मिर, मेघालय, अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, दार्जिलिंग, लडाख, सिमला, मनाली, देहराडून, उटी, म्हैसूर, मुन्नार या हिल स्टेशनसह केरळ आणि गोवा तसेच विदेशी पर्यटनात युरोपीयन देशात पर्यटक जाण्यास उत्सुक आहेत. शाळांना सुट्या नाहीत, शिवाय उन्हाळ्यात क्लासेस असल्यामुळे समूहाऐवजी वैयक्तिक प्रवासावर लोकांचा जास्त भर दिसून येत आहे. निवडणुकीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या नसल्याने यंदा पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे.
टूरला रेल्वे बुकिंगमुळे फटका
रेल्वेचे बुकिंग चार महिन्यांआधी सुरू होते. त्यावेळी पर्यटकांचे पॅकेज तयार नसते. जवळपास ७० टक्के लोक वेळेवर पर्यटनाचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना रेल्वेचे बुकिंग मिळत नाही. मिळण्यास पॅकेज महाग पडते. सध्या सर्वांनाच लक्झरियस पॅकेज हवे आहे. त्यामुळे पॅकेजचे कास्टिंग वाढले आहे. केरळमध्ये जून महिन्यात पाऊस येतो. उत्तर भारतात जुलै-ऑगस्टपर्यंत पाऊस कमी असतो. पर्यटकांचा लडाखकडे कल वाढला आहे.
हिल स्टेशनला पसंती
पर्यटकांची शिमला आणि मनालीसारख्या लोकप्रिय हिल स्टेशनला मागणी आहे. प्रवासी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये नवीन पर्याय शोधतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिएतनाम सारख्या कमी अंतराच्या आणि युरोप सारख्या लांब अंतराच्या पर्यटन स्थळांमध्ये रस वाढलेला आहे. यंदा विदर्भातील पर्यटकांची संख्या वाढली असून त्यांचा लक्झरियस सुविधांकडे जास्त कल आहे.
-मार्मिक शेंडे, धनलक्ष्मी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स.