कोरोनाच्या भीतीमुळे नागपुरात हॅन्ड सॅनिटायजरच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 09:18 PM2020-03-06T21:18:17+5:302020-03-06T21:18:40+5:30
कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर ‘हॅन्ड सॅनिटायजर’च्या मागणीतही वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूची दहशत आता सर्वत्र दिसून येत आहे. या रोगाच्या भीतीमुळे मास्कची मागणी वाढली असताना त्याच धर्तीवर ‘हॅन्ड सॅनिटायजर’च्या मागणीतही वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्जिकल आणि औषध विक्रेत्यांकडून ‘मास्क’ व ‘हॅन्ड सॅनिटायजर’ची धडाक्यात विक्री होत आहे.
शहरातील औषध विक्रेता निखील पाठक यांनी सांगितले, नागपूर शहरात सध्यातरी मुंबई, दिल्लीसारखी स्थिती नाही. येथे हॅण्ड सॅनिटायजरचा तुटवडा पडला आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडे मागणी वाढली आहे. यात द्रव स्वरुपातील सॅनिटायजरच्या तुलनेत जेल स्वरुपातील सॅनिटायजरला मोठी मागणी आहे.
हे महागही आहे. सध्या तरी औषधांच्या दुकानात ‘एमआरपी’ किमतीवर सॅनिटायजर मिळत आहे.
मास्कचा तुटवडा
शहरात मास्क वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. यामुळे मास्कच्या मागणीत वाढ होऊन तुटवडा पडला आहे. विशेषत: ‘एन-९६’ मास्क अनेक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध नाही. एका विक्रेत्याने सांगितले, मुंबई येथून पाच हजार मास्कचा आॅर्डर दिला आहे. परंतु ५०० मास्क मिळाले. मागणी वाढल्याने उत्पादकांवर ताण पडला आहे.