वसतिगृहाच्या मागणीसाठी ‘कॅम्पस’ला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:07 PM2018-08-23T23:07:08+5:302018-08-23T23:08:07+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या प्रवेशाच्या मुद्यावरून गुरुवारी अमरावती मार्गावरील ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विनापरवानगी विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीला प्रशासनाने टाळे लावले. याचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या विद्यार्थ्यांनी अद्याप वसतिगृह सोडले नसल्यामुळे अनेक नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या प्रवेशाच्या मुद्यावरून गुरुवारी अमरावती मार्गावरील ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विनापरवानगी विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीला प्रशासनाने टाळे लावले. याचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या विद्यार्थ्यांनी अद्याप वसतिगृह सोडले नसल्यामुळे अनेक नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील वसतिगृहामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले ११९ विद्यार्थी राहत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ३० एप्रिलला वसतिगृह रिकामे करावे, असे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले होते. मात्र काही जणांच्या परीक्षा बाकी असल्याने विद्यापीठाने ही मुदत १० जूनपर्यंत वाढविली. मात्र तरीदेखील विद्यार्थी निघाले नाहीत. त्यानंतर ही मुदत १० जुलैपर्यंत वाढविण्यात आली. तोपर्यंत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे वसतिगृहासाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ११९ विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत खोल्या रिकाम्या करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले. तरीदेखील विद्यार्थ्यांनी खोल्या सोडल्या नाहीत. अखेर नाईलाजाने विनापरवानगी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांना सुरक्षारक्षकांनी टाळे ठोकले.
याविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. यावेळी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, मात्र आम्हालाही त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी द्या, अशा मागणीसाठी चक्क विद्यापीठ परिसराचे प्रवेशद्वारच बंद केले. त्यामुळे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची प्रवेशद्वारासमोर मोठी गर्दी जमली होती. अखेर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी धाव घ्यावी लागली.
तरच मिळेल वसतिगृहात परत प्रवेश
यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ.येवले व डॉ.खटी यांच्यासमोर मागण्या ठेवल्या. मात्र एकदा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्याला परत दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर नियमानुसार लगेच वसतिगृह देता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा प्रथम वर्ष प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर जर काही जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्यांना पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल, असे डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.
प्रथम वर्षाचे विद्यार्थी अद्याप प्रतीक्षेतच
नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही नव्याने अनेक प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळूनही जाता आलेले नाही. जुन्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडलेले नाही. त्यामुळे नव्या विद्यार्थ्यांना तेथे जाता आलेले नाही. जुन्यापैकी तर अनेक विद्यार्थी आता तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. काही जण तर नोकरीदेखील करत आहेत. तर काही जण चक्क ‘कॅम्पस’मध्ये तासिका तत्वावर शिकवत आहेत. अशा स्थितीत त्यांना वसतिगृहात रहायला परवानगी दिली तर तो नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल. त्यांचादेखील जुन्या विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा, असे मत डॉ. नीरज खटी यांनी व्यक्त केले.