इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:17 AM2021-05-06T00:17:48+5:302021-05-06T00:22:40+5:30
immunity grown tulsi सध्या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधी रोपट्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचे गुणधर्म अनादिकाळापासृून सांगितले आहेत. मात्र ॲलोपॅथीचा वापर अधिक वाढलेल्या काळात या औषधी वनस्पतींकडे दुर्लक्ष झाले होते. आता पुन्हा नागरिक त्यांच्या वापराकडे वळल्याचे या दिवसांत दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधी रोपट्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचे गुणधर्म अनादिकाळापासृून सांगितले आहेत. मात्र ॲलोपॅथीचा वापर अधिक वाढलेल्या काळात या औषधी वनस्पतींकडे दुर्लक्ष झाले होते. आता पुन्हा नागरिक त्यांच्या वापराकडे वळल्याचे या दिवसांत दिसत आहे.
नागपुरात वनविभागासह अनेक खासगी नर्सरी आहेत. या सर्वच ठिकाणी आता मागणी वाढली आहे. विशेषत: काळमेघ, गुळवेल, तुळस, पिंबरी, अश्वगंधा, शतावरी, पानवा, मधुशामक, गवती चहा या वनस्पतींच्या रोपट्यांच्या मागणीसाठी नर्सरीचालकांकडे मागणीचे कॉल आता अनपेक्षितपणे वाढले आहेत. कोरोना लॉकडाऊनचा काळ संपल्यावर खरेदी वाढणार असल्याने तुटवडा भासणार असल्याचे मत नर्सरीचालकांचे आहे. नागरिकांचा काढ्यावर अधिक भर आहे. त्यामुळे काढ्यासाठी असलेल्या रॉ मटेरियलची मागणी जोरात आहे. विशेषत: गवती चहा, गुळवेल पानांना मागणी अधिक आहे.
मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. औषधी वनस्पतींचे बेणं आणि बिया दुर्मीळ असल्याने लवकर मिळत नाही. मात्र मदर प्लँटच्या माध्यमातून आम्ही कलमा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. जून महिन्यानंतर मोठ्या प्रमाणावर विक्री वाढणार आहे.
- अंबरीश घटाटे, नर्सरी चालक, नागपूर
वरिष्ठांच्या सूचनेनुसार औषधी वनस्पतींची रोपे यंदा सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीत तयार करत आहोत. सेमिनरी हिल्स नर्सरीमध्ये ही रोपे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. जुलै महिन्यात ती उपलब्ध होतील. १० हजार औषधी वनस्पती रोपांचे नियोजन आहे.
- गीता नन्नावरे, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, नागपूर
या पाच रोपांना वाढली मागणी
गुळवेल
ही औषधी वनस्पती प्रतिकारक शक्ती वाढविते. कॅन्सर, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचारोग, नेत्रविकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी-पडसे, हृदयविकार आदींवर उपयुक्त आहे.
तुळस
तुळशीत जीवनसत्त्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत. याचे तेल एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते. विविध आजारांवरही वापर होतो. सर्दी, खोकला, ताप, दातदुखी, श्वासारोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुप्फुसांचे रोग, हृदयाचे विकार, यात तुळस वापरली जाते.
अश्वगंधा
ही आपल्या शरीर आणि मेंदूसाठी इतरही बरेच फायदे देते. मेंदूच्या कार्यास चालना देऊ शकते, रक्तातील साखर आणि कॉर्टिसॉलची पातळी कमी करू शकते. चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांवर अश्वगंधा एक प्राचीन औषधी वनस्पती आहे.
शतावरी
कॅन्सर, क्षयरोग, कुष्ठरोग, आम्लपित्त, एड्स इत्यादी आजारांवर उपचार करण्यासाठी शतावरी उपयोगात आणतात. कॅन्सरच्या रुग्णांना तर शतावरी वरदानरूप आहे. ही कडू-गोड चवीची, काटेरी झुपकेदार असून, मुख्यत: आम्लपित्त दोषासाठी वापरली जाते.
काळमेघ
ही औषधी वनस्पती रक्त शुद्ध करते. मधुमेहात अत्यंत उपयोगी आहे. हृदयविकार, कॅन्सरवर उपयुक्त असून, अनिद्रादोष घालवते व रोगप्रतिकारक क्षमता वाढविते. व्हायरल संक्रमण, लिव्हरचे दोष सुधारते. जखम भरणे, अपचन यातही फायदेशीर आहे.