होळीत ‘मेड इन इंडिया’ पिचकाऱ्यांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 09:22 PM2020-03-06T21:22:17+5:302020-03-06T21:22:37+5:30
होळीमध्ये विकणाऱ्या चिनी पिचकाऱ्या आणि अन्य वस्तूंची आवक बंद असल्याने भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनसाठी जीवघेणा ठरलेला कोरोना व्हायरस रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर भारतीय उत्पादकांच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. होळीमध्ये विकणाऱ्या चिनी पिचकाऱ्या आणि अन्य वस्तूंची आवक बंद असल्याने भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. पण होळीप्रेमींना वस्तूंची खरेदी जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. होळीसाठी बाजारात भारतीय वस्तूंची रेलचेल वाढली आहे.
होळीत पिचकारी, फुगे यांचीही उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी चीनमधून आॅईल पेंट, स्कारलेट रेड, क्रिस्टल व्हायोलेट, ब्रिलियंट ग्रीन, ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉर्निश यांसारखे अपायकारक रंग मोठ्या प्रमाणावर आयात होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे चिनी पिचकारी तसेच चिनी रंग बाजारातून गायब झाले असून ‘मेड इन इंडिया’ पिचकारीला चांगले दिवस आले आहेत. प्रत्येक भारतीय सणाला चिनी वस्तू बाजारांवर कब्जा करतात.
मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव भारतीय सणांवर पडला असून चिनी पिचकारी व रंगांची आयात झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात लहानांकडून पब्जीच्या पिचकारीला विशेष मागणी आहे. साधी पिचकारी ५० ते २०० रुपयांपर्यंत तर प्रेशर देऊन रंग उडणाऱ्या पिचकारीचे भाव ५०० रुपयांपर्यंत आहेत.
एक कोटींच्या गुलालाची विक्री
मार्च महिन्यात जवळपास १३० टन गुलालाची विक्री होते. त्यापैकी १०० टन गुलाल होळीला विकल्या जातो. ठोकमध्ये प्रति किलो ५० रुपये तर किरकोळमध्ये १०० रुपयांत विक्री होत आहे. इतवारी गुलालासाठी ठोक बाजारपेठ आहे. येथून संपूर्ण विदर्भात वितरण होते. आरारोटपासून सात रंगात गुलालाची निर्मिती करण्यात येते. नागपुरात ५ ते ६ जण उत्पादक आहेत. इतवारीतील मगनलाल हिरुमल अॅण्ड सन्सचे ललितभाई म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून खऱ्या रंगाची उधळण कमी झाल्याने गुलालाची विक्री वाढली. सध्या उठाव कमी आहे. होळीच्या दोन दिवसांपूर्वी विक्री वाढेल.
गेल्या दहा वर्षांपासून भारतीय सणांचे स्वरूप बदलत असून रासायनिक रंगांचे दुष्परिणाम वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रंगांपासून सावध राहून नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन विविध संस्था, संघटनांकडून करण्यात आले आहे.