साहित्य संमेलनासाठी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची सरकारकडे एक कोटीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:53 PM2017-11-30T14:53:55+5:302017-11-30T14:56:50+5:30
बडोदा येथे होत असलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाकरिता अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने महाराष्ट्र सरकारकडे १ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बडोदा येथे होत असलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाकरिता अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने महाराष्ट्र सरकारकडे १ कोटी रुपयांची मागणी केली आहे. अवघ्या २५ लक्ष रुपयांच्या तुटपुंज्या अर्थ सहाय्यामध्ये बडोदा येथील निमंत्रितांचा प्रवासखर्च व मानधन बसत नाही अशी महामंडळाची भूमिका आहे.
अ.भा. म. सा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांना अलीकडेच तसे पत्र पाठवून आपली अपेक्षा व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र शासन मराठी साहित्य संमेलनसाठी दरवर्षी २५ लाख रुपये देते. परंतु मागच्या २५ वर्षांपासून हे अनुदान तेवढेच असल्याने त्या रकमेचे आजचे भरपाई मूल्य म्हणून ही रक्कम किमान एक कोटी करावी यासाठी महामंडळाने डोंबिवलीत झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसा ठराव करून शासनाकडे पाठविला व त्याचा पाठपुरावाही सातत्याने सुरू आहे. परंतु शासन अद्यापही याबाबत निर्णय घ्यायला तयार नाही. हा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
कर्नाटक सरकार देतेय आठ कोटी
तिकडे कर्नाटक सरकार मात्र आपल्या भाषा, साहित्य, संस्कृतीच्या जतन, संवर्धनासाठी सजगता दाखवत कन्नड साहित्य संमेलनाकरिता तब्बल आठ कोटी रुपये देत आहे. मग आपल्या सरकारला यात काय अडचण आहे असा प्रश्न उपस्थित करून या विसंगतीकडेही महामंडळाने या पत्रात लक्ष वेधले आहे.