३० जुलैपर्यंत नागपुरातील मालमत्ताधारकांना डिमांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:21 PM2018-06-25T22:21:40+5:302018-06-25T22:23:05+5:30
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक सिस्टिम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात घोळ घातल्याने एकाच कामासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या़ अद्यापही सर्वेक्षणाचे काम अपूर्णच आहे़ येत्या महिनाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. ३० जुलैपर्यंत सर्व मालमत्ताधारकांना कराची देयके अर्थात डिमांड पाठविल्या जाणार असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक सिस्टिम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात घोळ घातल्याने एकाच कामासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या़ अद्यापही सर्वेक्षणाचे काम अपूर्णच आहे़ येत्या महिनाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. ३० जुलैपर्यंत सर्व मालमत्ताधारकांना कराची देयके अर्थात डिमांड पाठविल्या जाणार असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
शहरात साडेपाच लाख मालमत्ता असल्याची मनपात नोंद आहे़ प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक मालमत्ता आहेत़ सर्व मालमत्ता कराच्या कक्षेत आणून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व मालत्तांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले़ सायबरटेक या खासगी कंपनीला हे काम देण्यात आले़ या कंपनीने सर्वेक्षणात मोठा घोळ घातला़ अनेक चुका या सर्वेक्षणात झाल्या़ शिवाय अव्वाच्यासव्वा करआकारणी करण्यात आली़ नव्या पद्धतीने करआकारणी करीत शहरातील १ लाख ३९ हजार नागरिकांना चालू वर्षाच्या कराच्या डिमांड पाठविण्यात आल्या़ यात मालमत्ता कर १० ते १५ पट वाढल्याचे पाहून नागरिक चक्रावून गेले़ याचा कर वसुलीवर परिणाम झाला.
नागरिकांचा विरोध विचारात घेता कर दुपटीपेक्षा अधिक वाढणार नाही, असा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला़ हा सर्व घोळ निस्तरण्यात वर्ष निघून गेले़ तर सायबरटेकला दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करता न आल्यामुळे दोन कंपन्यांकडे काम सोपविण्यात आले़ या कंपन्यांना दिलेली मुदत जुलैला संपत आहे़ या कालावधीत सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल़ तसेच ३० जुलैपर्यंत सर्व मालमत्ताधारकांना कराच्या डिमांड पाठविल्या जातील़ दररोज सात ते आठ हजार मालमत्तांचे असेसमेंट करून डिमांड काढल्या जात असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली़
सभागृहाच्या निर्णयानंतरही जागा भाड्याने
महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची जागा भाड्याने देण्यासंदर्भातील धोरण निश्चित होईपर्यंत कोणतीही शाळा वा परिसरातील जागा भाड्याने दिली जाणार नाही, असा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला होता. त्यानंतरही मौजा बाभूळखेडा, बॅनर्जी ले-आऊ ट येथील भगावननगर मराठी प्राथमिक शाळा परिसरातील व्यायाम शाळा इमारत व वाचनालय रुख्मन मेमोरियल सोसायटीला शैक्षणिक कार्यासाठी देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.