नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला पाच लाखाच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:53 PM2019-08-13T23:53:24+5:302019-08-13T23:55:06+5:30
अश्लील व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे. विशेष म्हणजे कुवैतवरून विद्यार्थिनीला धमकी देण्यात येत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अश्लील व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे. विशेष म्हणजे कुवैतवरून विद्यार्थिनीला धमकी देण्यात येत होती. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये डॉ. अभय कुमार ब्रिजकिशोर प्रसाद (३९) लोहियानगर, पाटणा, बिहार, अॅण्ड्र्यू अंडरसन ऊर्फ मार्टिन डिक्रूज ऊर्फ फिरोज अब्दुल रहीम अन्सारी (२९) जमशेदपूर, झारखंड तसेच नौफल पी.पी. कुंजीयन (३५) मल्लापुरम, केरळ यांचा समावेश आहे. झोन २ च्या डीसीपी विनीता साहू यांच्या उपस्थितीत अंबाझरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांनी याप्रकरणी माहिती दिली.
पीडित युवती प्रतापनगर येथील रहिवासी आहे. तिची सात-आठ वर्षांपूर्वी डॉ. प्रसाद याच्याशी सोशल मीडियावरून ओळख झाली होती. युवती संपन्न कुटुंबातील आहे. डॉ. प्रसाद हा आर्थिक तंगीत होता. त्याचा कौटुंबिक वाद न्यायालयात सुरू आहे. त्याने युवतीला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले. डॉ. प्रसाद याचा फिरोज अन्सारी हा मित्र आहे. प्रसादने फिरोजला तिच्याशी मैत्री करण्यास सांगितले. फिरोजने तिला आपल्या जाळ्यात ओढले. युवतीची विदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती. फिरोजने तिला विदेशात प्रवेश मिळवून देण्याचे सांगितले. फिरोज मे २०१७ मध्ये कुवैत येथे जनरेटर मेकॅनिक म्हणून काम करीत होता. युवती त्याच्या जाळ्यात ओढल्या गेली. फिरोजने युवतीची अश्लील व्हिडिओ क्लीप मिळविली. त्या आधारे तो युवतीला फोन करून पाच लाख रुपयांची मागणी करू लागला. पैसे न दिल्यास व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.
युवतीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर सेलने प्रकरणाचा तपास केला. तपासात युवतीला गोवा येथील मडगाव व केरळातील मल्लापुरम येथून फोन आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मल्लापुरम येथून नौफल याला अटक केली. दरम्यान, युवतीने पैसे न दिल्यामुळे फिरोजने तिच्या सहा क्लीपिंग व्हायरल केल्या. पोलीस सतर्क असल्याने त्यांनी टिष्ट्वटर व पोर्न साईटवरून या क्लीपिंग काढून घेतल्या. युवतीने फिरोजला केवळ पाच क्लीप पाठविल्या होत्या. एक क्लीप डॉ. प्रसादला पाठविली होती. त्यामुळे पोलिसांना डॉ. प्रसादवर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने व्हिडिओ क्लीप फिरोजला दिल्याचे सांगितले.
फिरोज कुवैतला होता. त्यामुळे भारतात येईपर्यंत त्याला पकडणे शक्य नव्हते. फिरोजच्या विरुद्ध लुटपाट व कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी फिरोजच्या विरुद्ध एलओसी जारी केला. पोलिसांना फिरोज ८ ऑगस्टला भारतात येत असल्याची माहिती मिळाली. ८ ऑगस्टला फिरोज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला. अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. ही कारवाई डीसीपी श्वेता खेळकर, विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय करे, सायबर सेलचे विजय माने, एएसआय शरद मिश्रा, हवालदार संतोष मदनकर, अमित भुरे व हेमराज गांजरे यांनी केली.
कॉल कुवैतहून, लोकेशन भारतातील
आरोपींनी पैसे मागण्यासाठी हायटेक टेक्नॉलॉजी वापरली. फिरोज आपल्या फोनमधून व्हीओआयपी
(व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल)चा वापर करून गोवा व मल्लापुरमच्या सीमबॉक्सवर फोन करीत होता. सीमबॉक्सवर ३० ते ३५ सीमकार्ड असतात. येथून कॉल भारतीय नंबरवर डायव्हर्ट होऊन पीडित युवतीच्या मोबाईलवर कनेक्ट होत होते. पोलिसांना सीडीआर रिपोर्टमध्ये मडगाव, गोवा, मल्लापुरम, केरळ येथून कॉल आल्याची माहिती मिळाली. तिथे पोहचल्यानंतर पोलिसांना खरी परिस्थिती गवसली. अनेक ठिकाणी असे बोगस कॉल सेंटर आहेत. याचा वापर आतंकी संघटनाही करीत असल्याचे बोलले जात आहे.
दूरसंचार विभागाला ६ कोटीचा चुना
मडगाव व मल्लापुरममध्ये मिळालेल्या बोगस कॉल सेंटरवर रोज शेकडोच्या संख्येने विदेशी कॉल येतात. या आयएसडी कॉलमुळे दूरसंचार विभागाच्या ६ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी बोगस कॉल सेंटरमधून ७५५ सीमकार्ड व १० सीम बॉक्स ताब्यात घेतले. दक्षिण भारतात ६० ते ६५ हजार रुपयात सीम बॉक्स मिळतो. तिथे अनेक लोक याचा किरायाने देऊन व्यवसाय करतात.
पोलिसांना प्रत्येक वळणावर दिली मात
फिरोज फक्त डिप्लोमा पास झाला आहे. परंतु त्याने ह्या प्रकरणाला अतिशय शिताफीने हाताळले होते. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तो शेवटपर्यंत पोलिसांची दिशाभूल करीत होता. हे प्रकरण सोडविण्यासाठी पोलिसांना १३ राज्यात तपास करावा लागला. हे प्रकरण सायबर पोलिसांसाठी एक नवा अनुभव ठरले.