नागपुरात डॉक्टरला ५० लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 08:09 PM2019-02-16T20:09:33+5:302019-02-16T20:49:39+5:30

अंबाझरीतील एका डॉक्टर दाम्पत्याला ५० लाखांची खंडणी मागून, खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चार आरोपींना अंबाझरी पोलिसांनी अटक केली.

Demand for Rs 50 lakh ransom to doctor in Nagpur | नागपुरात डॉक्टरला ५० लाखांच्या खंडणीची मागणी

नागपुरात डॉक्टरला ५० लाखांच्या खंडणीची मागणी

Next
ठळक मुद्देआधी पाठविले पत्र, नंतर फोन करून धमकीअंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरीतील एका डॉक्टर दाम्पत्याला ५० लाखांची खंडणी मागून, खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चार आरोपींना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. मंगेश रामदास उईके (वय ३७, रा. तकिया धंतोली), फिरोज खान मोहम्मद जाबिर खान (वय ३५, रा. बोरियापुरा, मोमिनपुरा), राधेश्याम परिमल सरकार (वय २७, रा. गौरनगर, गोंदिया) आणि मोहसिन खान मोहम्मद जाबिर खान (वय ३२, रा. मोमिनपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
डॉ. आशिष अरुणराव चौधरी (वय ४४) यांचे इस्पितळ असून त्यांची पत्नी सपना लॅब संचलित करतात. ते अंबाझरीतील शिवाजीनगरात राहतात. ८ फेब्रुवारीला सकाळी १०.१५ वाजता त्यांच्याकडे असलेल्या चौकीदाराच्या हातात पोस्टमनने एक पत्र दिले. सपना यांनी हे पत्र फोडले. त्यात एका संघटनेचे नाव होते. तुम्हाला स्वत:च्या आणि मुलांच्या जीवाची पर्वा असेल तर ५० लाखांची खंडणी तयार ठेवा, आम्ही फोन करून नंतर काय ते कळवू, असे या पत्रात नमूद होते. सपना यांनी पती डॉ. आशिष यांना तर आशिष यांनी पोलिसांना ही माहिती कळविली. अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी डॉ. चौधरी दाम्पत्यासोबत चर्चा करून हे सर्व वरिष्ठांना कळविले. त्यानंतर खंडणीसाठी धमकी देणाºयांची वाट बघणे सुरू झाले. ११ फेब्रुवारीच्या रात्री ९.३५ वाजता चौधरी यांच्याशी एका आरोपीने संपर्क केला. ‘लेटर पढा क्या, असे विचारत त्याने नही पढा होंगा तो बता देते है, ५० लाख तयार रखना. पैसे नही दिये तो तुम लोगोंको जान गवानी पडेंगी’ अशी धमकी आरोपीने दिली. ९०९८८ ७७४२६ या क्रमांकावरून धमकी देणाराने फोन केला होता. ही माहिती कळताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मराठे आणि अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपींचा माग काढणे सुरू केले. मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका आरोपीचा छडा लावला. त्याच्या मुसक्या बांधल्यानंतर त्याने या प्रकरणात सहभागी असलेल्या सूत्रधारासह अन्य आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार, पोलिसांनी मंगेश उईके, फिरोज खान, राधेश्याम सरकार आणि मोहसिन खान या चारही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा सूत्रधार मंगेश उईके असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
घरचाच कर्मचारी निघाला भेदी 
घर का भेदी लंका ढाए या म्हणीचा प्रत्यय या प्रकरणात आला. आरोपी सरकार हा सपना चौधरी यांच्या पॅथोलॉजी लॅबमध्ये कार्यरत होता. त्यामुळे त्याचे चौधरी यांच्या घरी, इस्पितळात जाणे-येणे होते. त्याला रोज किती रक्कम येते, घरात कोण कोण आहेत, त्यांची दैनंदिनी काय, त्यांचे संपर्क क्रमांक काय, याची सर्व माहिती होती. सरकारची मंगेश उईकेसोबत ओळख होती. उईके गुन्हेगारी वृत्तीचा आहे. नुसती धमकी दिली तरी डॉक्टर चौधरींकडून मोठी रक्कम मिळू शकते, असा आरोपींना विश्वास होता. त्यामुळे मंगेशने खंडणी हडपण्यासाठी कट रचला. त्यात फिरोज आणि मोहसिनला सहभागी करून घेतले. मंगेशने खंडणीची मागणी करणारी व धमकी देणारी चिठ्ठी लिहिली. तर, आरोपी मोहसिनने सीमकार्ड मिळवून दिले. हे सीमकार्ड सीताबर्डीतून विकत घेतलेल्या एका छोट्याशा फोनमध्ये घालून आरोपी फिरोजने खंडणीची मागणी करणारा फोन केला. 
असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
खंडणी मागून धमकी दिल्यानंतरही आरोपींनी जुन्या-नव्या मोबाईल आणि सीमचा वापर सुरूच ठेवला. त्यांच्या फोन, सीमकार्ड डिटेल्सच्या आधारेच पोलिसांना आरोपींचा छडा लावला. त्यानंतर शनिवारी सकाळपासून पोलीस उपायुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी अंबाझरीसह गुन्हे शाखेचीही पथके कामी लावली. अटक करण्यात आलेल्यांपैकी मोहसिन आणि फिरोज हे दोघे भाऊ आहेत. ते कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर तहसील ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मोहसिन ऊर्फ कालूला यापूर्वी तडीपारही करण्यात आले आहे.

Web Title: Demand for Rs 50 lakh ransom to doctor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.