देशी व संकरित गायी-म्हशींच्या २६ हजारांवर विर्यमात्रांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:44+5:302021-09-07T04:11:44+5:30
नागपूर : राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत राज्यात पशुधन उत्पादकता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातून संकरित गायी आणि ...
नागपूर : राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत राज्यात पशुधन उत्पादकता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातून संकरित गायी आणि म्हशींच्या मादी वासरांच्या निर्मितीसाठी २६ हजार ४० वीर्यमात्रांची मागणी नोंदविण्यात आली आहे. अतिशित रेत प्रयोगशाळेकडे ही मागणी नोंदविण्यात आली असून, जिल्ह्यामध्ये सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून या लिंगविनिच्श्रीत वीर्यमात्रा लवकरच उपलब्ध होणार आहेत.
राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामुळे शेतीकामात बैलांची आवश्यकता कमी झाली आहे. त्यामुळे नर वासरांच्या आणि बैलांच्या संगोपनाचा अनावश्यक खर्च शेतकऱ्यांवर पडत आहे. नर वासरांची उत्पत्ती संख्या कमीत कमी राखण्यासाठी पारंपरिक वीर्यमात्राऐवजी ‘लिंगविनिच्श्रीत वीर्यमात्रा’ हे नवे आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रीय स्तरावर वापरले जाणार आहे. यातून गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. मंजूषा पुंडलिक यांनी केले आहे.
...
कोट
गायी-म्हशींमध्ये पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी पुढील ५ वर्षांच्या कालावधीत लिंगविनिच्श्रीत वीर्यमात्रांच्या उपयोगातून गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनातून मादी वासरांची पैदास करण्याची ही योजना आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकांशी संपर्क करून या योजनेचा लाभ घ्यावा.
- सुनील केदार, पशुसंवर्धन मंत्री
...
फक्त ८१ रुपयांत मिळणार मात्रा
या कार्यक्रमांतर्गत एका लिंगविनिच्श्रीत वीर्यमात्रेची शासनाची खरेदी किंमत ५७५ रुपये आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ही किंमत ८१ रुपये आकारली जाणार असून, उर्वरित ४९४ रुपयांची रक्कम शासन देणार आहे.