नागपुरात  निर्जंतुकीकरणासाठी फवारणीचा आग्रह वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:43 PM2020-03-30T21:43:31+5:302020-03-30T21:44:56+5:30

निर्जंतुकीकरण करण्यासाठी अग्निशमन विभागाच्या ११ गाड्यांचा, शेकडो पंपांचा वापर केला जात आहे. शहरातील सर्वच भागातून फवारणीची मागणी होत आहे.

The demand for spraying for disinfection increased in Nagpur |  नागपुरात  निर्जंतुकीकरणासाठी फवारणीचा आग्रह वाढला

 नागपुरात  निर्जंतुकीकरणासाठी फवारणीचा आग्रह वाढला

Next
ठळक मुद्देपावसामुळे व्यत्यय : अग्निशमन विभागाच्या ११ गाड्या व शेकडो पंपांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या वतीने कोरोना विषाणू (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. निर्जंतुकीकरण करण्यासाठी अग्निशमन विभागाच्या ११ गाड्यांचा, शेकडो पंपांचा वापर केला जात आहे. शहरातील सर्वच भागातून फवारणीची मागणी होत आहे. एकाच वेळी शहरातील सर्व भागात फवारणी शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने फवारणी केली जात आहे.
शुक्रवारी अग्निशमन विभागाच्या ११ गाड्यांनी फवारणीला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी शनिवारीही फवारणी सुरू होती. रविवारी फवारणीसाठी झोन कार्यालयात गाड्या पोहचल्या होत्या. परंतु सायंकाळी पाऊस आल्याने फवारणी बंद ठेवावी लागली. सोमवारी पुन्हा फवारणी करण्यात आली. यासोबतच फवारणीला गती देण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने १०० फवारणी पंप उपलब्ध केले आहेत. तसेच मलेरिया व फायलेरिया विभागातील कर्मचारीही फवारणीच्या कामाला लागले आहेत.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका क्षेत्रात आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही मोेहीम हाती घेण्यात आली. परंतु शहराच्या सर्वच भागातून फवारणीची मागणी होत आहे. नगरसेवकांकडून यासाठी आग्रह धरला जात आहे. एका प्रभागात फवारणीसाठी चार ते पाच दिवस लागतात. त्यामुळे मागणी होत असली तरी फवारणीला काही दिवस लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

फवारणीच्या ठिकाणीही गर्दी
पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या व वर्दळीच्या भागात फवारणीला सुरुवात करण्यात आली. परंतु अनेक नगरसेवक फवारणीसाठी आग्रह करीत असून, फवारणीच्या वेळी कार्यकर्त्यांसह गर्दी करीत असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.

सोडियम हायपोक्लोराईडची गरज
अग्निशमन वाहनामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार करून फवारणी केली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे. संपूर्ण शहरात फवारणी करण्यासाठी प्रशासनाला सोडियम हायपोक्लोराईडचा पुरेसा साठा उपलब्ध करावा लागणार आहे.

Web Title: The demand for spraying for disinfection increased in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.