‘आपली बस’ सुरू करण्याची मागणी : नागरिकांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 08:48 PM2020-08-13T20:48:01+5:302020-08-13T20:49:40+5:30
शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शहरातील आपली बसची चाके थांबली. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कार्यालये, बाजार बंद झाल्यामुळे नागरिकांचे बाहेर निघणे थांबले होते. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्व बाजार आणि कार्यालये सुरू होत आहेत. नागरिकही आपल्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु त्यांना आपल्या घरून बाजारात किंवा कार्यालयात जाण्यासाठी स्टार बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना घरून बाजारात जावयाचे असल्यास ते दुचाकीवर जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्यांना आपली बसची गरज भासत आहे. परंतु आपली बसच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
...तर बस होतील खराब
जवळपास पाच महिन्यापासून आपली बस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. एकाच ठिकाणी बसेस उभ्या असल्यामुळे त्या खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत बसेसची वाहतूक सुरू झाल्यास त्यांची देखभाल करता येणे शक्य होणार आहे. महापालिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत आपली बसची वाहतूक सुरू झाल्यास महापालिकेचे उत्पन्न सुरू होईल.
अद्याप काहीच आदेश नाहीत
आपली बसच्या वाहतुकीबाबत महापालिकेच्या परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांना विचारणा केली असता, आपली बस सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य शासनाचा काहीच आदेश आला नसल्याची माहिती त्यांनी दिली.
वाडीवरून दररोज येत होतो सीताबर्डीला
वाडी येथील रहिवासी रमेश मेश्राम यांनी सांगितले की, ते सीताबर्डी येथील एका कापडाच्या दुकानात काम करतात. ते दररोज आपली बसने ये-जा करीत होते. लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असल्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. परंतु आता दुकान सुरू झाल्यामुळे त्यांना वाडीवरून सीताबर्डीला येणे कठीण होत आहे.
गोरेवाडा ते सीताबर्डीचा प्रवासही कठीण
गोरेवाडा येथील रहिवासी आकाश निकोसे यांनी सांगितले की, ते सीताबर्डीतील मोदी नंबर ३ मधील मोबाईलच्या दुकानात काम करतात. लॉकडाऊनपूर्वी ते आपली बसने ये-जा करीत होते. परंतु आपली बस बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. ऑटोरिक्षाही बंद असल्यामुळे त्वरित आपली बस सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.