नागपुरातील हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:34 PM2018-02-24T12:34:56+5:302018-02-24T12:35:05+5:30
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती व स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती व स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी त्यांनी सप्टेंबर २०१५ पासून शासन व प्रशासन स्तरावर पत्रव्यवहार चालविला आहे. त्यांच्या मागणीच्या २५ महिन्यानंतर प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना पत्र देऊन याबाबत तपशील मागविला आहे.
भूषण दडवे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दडवे यांनी हेगडेवार स्मृती मंदिराला पर्यटन किंवा तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीबाबतची माहिती १८ सप्टेंबर २०१५ला माहितीच्या अधिकारात मागितली होती. यावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाने अशी मागणी कुणीही न केल्याचे उत्तर त्यांना दिले. त्यानंतर १२ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी दोन्ही कार्यालय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सरसंघचालक मोहन भागवत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार व खासदारांना लेखी निवेदन दिले होते. त्यावर मुख्यमंत्री कार्यालय आणि पर्यटन विभागाद्वारे दखल न घेतली गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यादरम्यान ३० जानेवारी २०१६ ला विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना पुढील कारवाईस्तव लेखी आदेश दिला होता.
मात्र याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दडवे यांनी पुन्हा ६ फेब्रुवारी २०१८ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, पालकमंत्री, पर्यटनमंत्री यांना निवेदन सादर केले.
यावर १७ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना हेडगेवार स्मारकाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भूषण दडवे यांनी दिली. ही माहिती, माहितीच्या अधिकारात मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
देशविदेशातून हजारो नागरिक तसेच संघाचे, भाजपाचे नेते व कार्यकर्ते दर्शनासाठी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात येत असतात. दरवर्षी विजयादशमीच्या कार्यक्रमादरम्यान लाखो लोक येथे येतात. या परिसरात वर्षभर अनेक सामाजिक शिबिरे, संघ शिक्षा वर्ग तसेच आमदार व मंत्र्यांची कार्यशाळा येथे होते. त्यामुळे या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा ही आमची मागणी आहे, असे दडवे यांनी सांगितले.