वसुली करणाऱ्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:50 PM2019-09-11T23:50:33+5:302019-09-11T23:53:49+5:30
५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
तहसील पोलीस ठाण्याजवळ १ सप्टेंबरला पावभाजी संचालकावर काही युवकांनी हल्ला केला. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तहसील पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी न करता गुन्हा दाखल करून निर्दोष युवकांविरुद्ध कारवाई केली. याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक बाल्या बोरकर ३ सप्टेंबरला तहसील पोलीस ठाण्यात गेले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी बाल्या बोरकर यांच्याशी वाद घातला. बोरकर यांनी आमदार कृष्णा खोपडे यांना तेथे बोलावले. खोपडे यांनी ९ सप्टेंबरला पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान, दिनेश आकरे नावाच्या युवकाने त्याच्या जवळून ५० हजार रुपये आणि मोबाईल घेतल्याचे सांगितले. आकरे याच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी दोन वाहनात पोलीस आले होते. आकरे आपल्या जवळील ५० हजार, मोबाईल पत्नीला देत होते. पाटील, अनिल चतुर्वेदी, किशोर महंत आणि त्यांच्या साथीदारांनी आकरे यांच्या खिशातून मोबाईल आणि ५० हजार रुपये घेतले. आमदार खोपडे यांनी पाटील यांना सल्ला देऊन पोलीस निरीक्षकांना तक्रार केली. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून मोबाईल, ५० हजार परत करण्यात आले. त्यानंतर आकरेला नेत्याजवळ गेल्यामुळे आणि कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन कारवाईचा धाक दाखविण्यात आला. या प्रकरणाचा तपास दुय्यम निरीक्षक सागर यांना सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. इतर पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई न झाल्यामुळे असंतोष पसरला आहे.