दिवाळीसाठी नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी, प्रवाशांची गर्दी वाढणार
By नरेश डोंगरे | Published: October 9, 2022 04:36 PM2022-10-09T16:36:32+5:302022-10-09T16:36:47+5:30
गैरसोय टाळण्यासाठी सुरू असलेल्या गाड्यांना अतिरिक्त कोच लावण्याची मागणी
नागपूर : दोन आठवड्यांवर आलेला दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने आणखी काही नव्या रेल्वेगाड्या सुरू कराव्या किंवा सुरू असलेल्या गाड्यांना अतिरिक्त कोच लावावे, अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रशासनाची नजर असून गर्दी ध्यानात घेऊन या संबंधाने लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
गणेशोत्सवापासून सर्व मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवाळीमुळे ती आणखी वाढणार आहे. त्यामुळे सध्या ज्या रेल्वेगाड्या भरभरून धावत आहेत, त्यात आणखी अतिरिक्त कोच लावण्याची किंवा नवीन गाड्या सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा प्रवाशांची तीव्र गैरसोय होईल. बाहेरगावी जाणाऱ्यांना एकमेकांना खेटून, उभे राहून प्रवास करावा लागेल. त्याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांना होईल.
विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार लक्षात घेता मध्य रेल्वेने चार फेस्टिव्हल साप्ताहिक स्पेशल ट्रेन २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा यापुर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन नंबर ०१०३३ ही २२ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मध्यरात्री १२.२० ला प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकावर येईल. या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी तो पुरेसा नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने आणखी काही रेल्वेगाड्या सुरू कराव्या अथवा सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांचे कोच वाढवावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.