'मागितले रेल्वे आरक्षण, मिळाले चक्क दोन डबे'; नितीन गडकरी मदतीसाठी धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 04:07 PM2020-03-08T16:07:43+5:302020-03-08T16:22:32+5:30
Nitin Gadkari : पुण्याच्या बालेवाडी मैदानावर १३ ते १५ मार्च या कालावधीत शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नागपूर : पुण्यात जाऊन स्वत:चे कर्तुत्व सिद्ध करण्याची जिद्द तर होती, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याची अडचण सतावत होती. कुठल्याही स्थितीत रेल्वेत बसण्यापुरती तरी जागा मिळावी ही अपेक्षा होती. इकडे तिकडे प्रयत्न करुन झाल्यावर त्यांनी अखेर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच गाठले अन् अडचण सांगितली. त्यांची जिद्द, डोळ्यातील चमक पाहून गडकरीदेखील प्रभावित झाले अन् एक संकल्पच घेतला.
अवघ्या चार दिवसांत सर्वांच्या कानावर बातमी आली अन् आश्चर्याचा धक्काच बसला. केवळ आरक्षण मागितले असताना हाती पडले ते चक्क भारतीय रेल्वेच्या पूर्ण दोन डब्यांचे ‘बुकिंग’च. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळकरी खेळाडूंसाठी ही बाब एक वेगळाच सुखद अनुभव देणारी ठरली. आजवर मंत्र्यांना केवळ आश्वासन देताना पाहिले होते. परंतु मागितल्यापेक्षा अधिक सुविधा देणारे गडकरी हे सर्वांहून वेगळेच आहे, अशी भावनाच या खेळाडूंच्या तोंडून बाहेर पडली.
पुण्याच्या बालेवाडी मैदानावर १३ ते १५ मार्च या कालावधीत शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांतील १४८ विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. पुण्याचा प्रवास हा १५ तासांहून अधिक असल्याने या खेळाडूंना रेल्वेगाडीत आरक्षण देण्यात यावे, यासंदर्भात जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग शाळेचे अध्यक्ष रमेश भंडारी यांनी नितीन गडकरी यांना भेटून निवेदन दिले.
गडकरी यांनी नेमकी परिस्थिती लक्षात आली व त्यांनी तत्काळ पुढाकार घेत थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाच पत्र लिहीले. या खेळाडूंना आरक्षण आवश्यक असून त्यांच्यासाठी दोन डबेच ‘बुक’ करावे असे त्या पत्रात नमूद होते. शिवाय विद्यार्थी हे दिव्यांग असून गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात ‘बुकिंग’ व्हावे अशी विनंतीदेखील त्यांनी केली.
गडकरींचे पत्र मिळताच रेल्वेमंत्र्यांनीदेखील याची तातडीने दखल घेतली व मध्य रेल्वेला त्यासंबंधातील निर्देश दिले. १२ मार्च रोजी नागपूर ते पुणे व १५ मार्च रोजी पुणे ते नागपूर या मार्गावर महाराष्ट्र एक्सप्रेसला दोन अतिरिक्त डबे लावण्याचे आदेशच त्यांनी जारी केले. यासंदर्भातील पत्र मध्य रेल्वेच्या ‘डीआरएम’लादेखील पाठविण्यात आले.
खेळाडूंसाठी खरोखरच मोठा दिलासा
दिव्यांग खेळाडू असल्याने त्यांच्यासमवेत शिक्षक तसेच ‘केअरटेकर’देखील जाणे आवश्यक होते. परंतु आवश्यक प्रमाणात आरक्षणच नसल्याने आम्ही चिंतीत झालो होतो. या खेळाडूंना बसने नेणे शक्य नव्हते. प्रवासानेच त्यांची परीक्षा घेतली असती. नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे या सर्व खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे स्पर्धेला जाण्याअगोदरच सर्व खेळाडू आनंदी झाले आहेत.
- सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, नागपूर