नागपुरात बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:33 PM2021-05-31T23:33:03+5:302021-05-31T23:33:26+5:30

Demanding ransom, arrested गॅंगस्टर रणजित सफेलकरच्या खात्यातून तुमच्या खात्यात लाखो रुपये जमा झाले. यावरून तुमचे आणि रणजित सफेलकरचे संबंध असल्याचे बदनामीकारक वृत्त सर्व वर्तमानपत्रात प्रकाशित करण्याचा धाक दाखवून दोन लाखाची खंडणी मागणारा आरोपी त्रिशरण शंकरराव सहारे (वय ५०, रा. सदोदय पॅलेस, गड्डीगोदाम) याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Demanding ransom by threatening defamation in Nagpur | नागपुरात बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी

नागपुरात बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी

Next
ठळक मुद्दे आरोपी सहारेला रंगेहा‌थ पकडले : गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गॅंगस्टर रणजित सफेलकरच्या खात्यातून तुमच्या खात्यात लाखो रुपये जमा झाले. यावरून तुमचे आणि रणजित सफेलकरचे संबंध असल्याचे बदनामीकारक वृत्त सर्व वर्तमानपत्रात प्रकाशित करण्याचा धाक दाखवून दोन लाखाची खंडणी मागणारा आरोपी त्रिशरण शंकरराव सहारे (वय ५०, रा. सदोदय पॅलेस, गड्डीगोदाम) याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रकरण रणजित सफेलकर, त्याचे साथीदार आणि फिर्यादी विश्वजित किरदत्त यांच्यात झालेल्या जमिनीच्या खरेदी- विक्रीशी संबंधित आहे.

भोसले राजघराण्याशी संबंधित असलेल्या विश्वजित किरदत्त यांच्यासोबत राकेश गुप्ता, ॲड. प्रकाश जयस्वाल आणि दुनेश्वर पेठे यांच्या नावे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा सौदा केला होता. या सौद्यापोटी विश्वजित आणि त्यांच्याशी (राजघराण्यातील) संबंधित व्यक्तींच्या खात्यात लाखोंची रक्कम जमा झाली. ही रक्कम गँगस्टर रणजित सफेलकर याच्या बँक खात्यातून वळती करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी ही खळबळजनक तेवढीच संवेदनशील घडामोड अधिकृतपणे उघड केली नाही. मात्र, या घडामोडीचा बोभाटा झाल्याने सर्वत्र उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपी त्रिशरण सहारे यांनी विश्वजित यांना फोन करून खंडणीसाठी त्रास देणे सुरू केले. गँगस्टर सफेलकरच्या खात्यातून राजघराण्याच्या खात्यात लाखो रुपये वळते झाले. गँगस्टरसोबत तुमचे फोटोसुद्धा आहेत. त्यामुळे तुमच्याविरुद्ध सर्व वर्तमानपत्रात बदनामीकारक वृत्त छापून प्रेस रिपोर्टर तुमची बदनामी करतील. ते टाळण्यासाठी तुम्हाला दोन लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे सहारे याने म्हटले. गॅंगस्टर सफेलकरसोबत कसलेही संबंध नसल्याने आणि खंडणी देण्याची इच्छा नसल्याने विश्वजित यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना ब्लॅकमेलिंगचा प्रकार सांगितला. त्यानुसार कारवाईसाठी रविवारी दुपारी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सेंट्रल अव्हेन्यू कृष्णम रेस्टॉरन्ट जवळ आरोपी सहारेला खंडणीची एक लाखाची रक्कम घेण्यासाठी विश्वजित यांनी बोलवून घेतले. दुपारी ४.१५ वाजता तो पोहोचला आणि खंडणीची रक्कम स्वीकारताच बाजूलाच दबा धरून बसलेल्या खंडणीविरोधी पथकाचे त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला गुन्हे शाखेत आणून चौकशी केल्यानंतर त्याच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. सदर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करून सहारेला अटक करण्यात आली.

३ जूनपर्यंत पीसीआर

सहारेला पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून त्याची ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विशाल काळे, सहायक निरीक्षक ईश्वर जगदाळे, सूरज सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

वेगवेगळी ओळखपत्रे जप्त

पोलिसांनी सहारेच्या घर आणि कार्यालयाची झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि वृत्तपत्र तसेच रेल्वेशी संबंधित वेगवेगळी ओळखपत्रे सापडली. ती जप्त करण्यात आली.

Web Title: Demanding ransom by threatening defamation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.