दर तीन सेकंदात एका व्यक्तीला डिमेंशिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:51+5:302021-09-21T04:08:51+5:30
-आज जागतिक अल्झायमर दिन नागपूर : अल्झायमर रोग हा स्मृती, विचार, भावना आणि वागणुकीत अडचणी निर्माण करणारा मेंदूचा आजार ...
-आज जागतिक अल्झायमर दिन
नागपूर : अल्झायमर रोग हा स्मृती, विचार, भावना आणि वागणुकीत अडचणी निर्माण करणारा मेंदूचा आजार आहे. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारा स्मृतिभ्रंश म्हणजे ‘डिमेंशिया’चा सर्वात सामान्य प्रकार आहे. जगात दर तीन सेकंदांनी एकाला डिमेंशिया होतो. अमेरिकेच्या भूतपूर्व अध्यक्षांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या आजाराने ग्रासले आहे. २१व्या शतकातील आरोग्य संकट म्हणून ‘डिमेंशिया’कडे पाहिले जात आहे, असे मत प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.
इंडियन अकॅडमी ऑफ न्युरोलॉजीतर्फे मंगळवारी जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ.मेश्राम म्हणाले, अल्झायमर रोग होण्यासाठी वाढते वय हा सर्वात मोठा घटक आहे. अल्झायमर आजाराचे निदान झालेले बहुतेक लोक ६५ किंवा त्याहून अधिक वयाचे असतात, परंतु या रोगाला २० वर्षांपूर्वीच सुरुवात झालेली असते. एकीकडे आयुष्य वाढत असताना, दुसरीकडे अल्झायमरचे रुग्ण वाढत आहेत.
- भारतात १,००० पैकी ४ लोकांना स्मृतिभ्रंश
डॉ.मेश्राम म्हणाले, जगात स्मृतिभ्रंश असलेले सुमारे ५ कोटी लोक आहेत. भारतात १,००० पैकी ४ लोकांना हा आजार दिसून येतो. पुढील १० वर्षांत याचे प्रमाण दुप्पट होईल. स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या आजारात मेंदूच्या पेशी खराब होतात आणि मेंदू संकुचित पावतो. विसराळूपणा ही अल्झायमर आजाराच्या रुग्णांची सर्वात सामान्य तक्रार आहे.
- ही आहेत लक्षणे
महत्त्वाच्या तारखा किंवा घटना विसरून जाणे, तारीख, वेळ आणि ठिकाण लक्षात न राहणे, घराचा मार्ग विसरणे, वाचताना अडचण येणे, नातेवाईक आणि मित्रांना न ओळखणे, नातेसंबंध विसरणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे. त्यांना दैनंदिन दिनचर्येमध्ये अडचण येणे, ही सामान्य लक्षणे आहेत. रुग्ण नेहमी गोंधळलेला, संशयास्पद, निराश, भयभीत किंवा चिंताग्रस्त होऊ शकतो. स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींची लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते.
- आजाराचे निदान शक्य
सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन आणि रक्ताच्या चाचण्यांमधून अल्झायमर रोगाचे निदान करता येते. सध्या अल्झायमर रोग बरा करण्यासाठी कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत, परंतु काही लक्षणांवर औषधोपचार केला जाऊ शकतो. ‘व्हिटॅमिन बी-१२’च्या कमतरतेमुळे, हायपोथायरॉइडीझममुळे स्मृतिभ्रंश झाल्यास तो औषधांद्वारे बरा होऊ शकतो. व्हिटॅमिन बी-१२चे प्रमाण शाकाहारी आहार करण्यांमध्ये अधिक दिसून येतो.
-आहार महत्त्वाचा
डिमेंशियामध्ये आहार महत्वाची भूमिका बजावतो. जे लोक उच्च कार्बोहायड्रेट आहार घेतात, सर्व प्रकारची साखर, जंक फूड, पॅकेज केलेले अन्न, कोल्ड ड्रिंक्स, फळांचे रस आणि सूर्यफूल तेल, राइस ब्रांड ऑइल, सोयाबीन तेल आणि हायड्रोजनयुक्त वनस्पती तेल स्वयंपाक करण्यासाठी वापरतात, त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता अधिक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम महत्त्वाचे ठरतो. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यांपासून दूर राहणे, मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा योग्य उपचार, नवीन गोष्टी शिकणे, छंद विकसित करणे आणि सामाजिक कामांमध्ये रस घेणे या स्मृती जपण्यासाठी आणि स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण बाबी आहेत.