दानवे यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By admin | Published: February 22, 2017 02:46 AM2017-02-22T02:46:01+5:302017-02-22T02:46:01+5:30
उपराजधानीसह राज्यात मनपा निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
गडकरींशीदेखील केली चर्चा : मतदानाच्या दिवशीच नागपुरात आल्याने तर्कवितर्कांना उधाण
नागपूर : उपराजधानीसह राज्यात मनपा निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय गाठले. दानवे यांनी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी सुमारे ३५ मिनिटे बंदद्वार चर्चादेखील केली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो असल्याचे दानवे यांनी सांगितले असले तरी राज्यातील राजकारण तापले असताना ते संघ मुख्यालयात आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मंगळवारी सकाळी दानवे नागपुरात पोहोचले व ८.३० च्या सुमारास ते थेट संघ मुख्यालयात पोहोचले. सरसंघचालकांशी चर्चा झाल्यानंतर ते गडकरी वाड्यावर गेले. तेथे गडकरींची भेट घेतल्यानंतर ते परत संघ मुख्यालयात आले. यासंदर्भात दानवे यांना विचारणा केली असता, आपण पुत्राच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकांनंतर निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य राजकीय समीकरणांवर यावेळी चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)