भुते यांची न्यायालयातून माघार
By admin | Published: September 29, 2015 04:16 AM2015-09-29T04:16:41+5:302015-09-29T04:16:41+5:30
वासनकर वेल्थ मॅनेजमेंटकडून आरटीजीएसमार्फत अविनाश रमेश भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात आलेली
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंटकडून आरटीजीएसमार्फत अविनाश रमेश भुते यांच्या ताजश्री समूहाच्या बँक खात्यात आलेली ९ कोटी १९ लाखांची रक्कम परत करण्यासाठी वेळ मागणारा अर्ज खुद्द भुते यांनी एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयातून सोमवारी मागे घेतला. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा होऊन भुतेविरुद्धचा पोलिसांच्या कारवाईचा मार्गही मोकळा झाला आहे.
वासनकर वेल्थ मॅनेजमेंटने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ५१५ गुंतवणूकदारांची १४३ कोटी ४ लाख ६८ हजार २५४ रुपयांनी लुबाडणूक केलेली आहे.
विवेक पाठक यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलिसांनी प्रशांत वासनकर आणि अन्य लोकांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब), ४०९ आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केले होते.
या घोटाळ्याचा तपास करताना पोलीस पथकाने प्रशांत वासनकर, विनय वासनकर, भाग्यश्री वासनकर, मिथिला वासनकर, अभिजित चौधरी आणि सरला वासनकर यांच्या बँक खात्यांचे अवलोकन केले असता, या सर्व आरोपींनी लबाडीने १६ मार्च २०१३ ते २२ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत भुते यांच्या व्यवसाय समूहाच्या बँक खात्यात ९ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम जमा केली होती.
वस्तुत: ही रक्कम या सर्व आरोपींची भविष्यात कामी येणारी सुरक्षित रक्कम होती.
‘त्या’ गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे आवाहन
दरम्यान, अॅड. मोहन अरमरकर आणि सुधीर दुरुगकर यांनी सर्वच गुंतवणूकदारांनी वासनकर आणि सहकाऱ्यांविरुद्ध आर्थिक गुन्हे पथकाकडे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले. मोठमोठ्या ठेवी गुंतवणाऱ्यांनी अद्याप तक्रारीच नोंदवल्या नाहीत, असे लक्षात आल्याचे ते म्हणाले. सर्व गुंतवणुकीदारांनी तक्रारी नोंदविल्यास न्याय मिळणे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.