नागपूर रेल्वे स्थानकावरील प्री-पेड आॅटोचालकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:16 PM2018-12-13T23:16:45+5:302018-12-13T23:18:26+5:30
अपघात झाल्यानंतर १०८ हा टोल फ्री क्रमांक लावल्यास त्वरित रुग्णवाहिका येते. या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे आॅटोंवर स्टिकर लावण्यात येत असून, त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे हे स्टिकर नि:शुल्क लावण्याची मागणी करून ५० रुपये घेण्यास रेल्वे स्थानकावरील प्री-पेड आॅटोचालकांनी गुरुवारी विरोध दर्शवून निदर्शने आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघात झाल्यानंतर १०८ हा टोल फ्री क्रमांक लावल्यास त्वरित रुग्णवाहिका येते. या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे आॅटोंवर स्टिकर लावण्यात येत असून, त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे हे स्टिकर नि:शुल्क लावण्याची मागणी करून ५० रुपये घेण्यास रेल्वे स्थानकावरील प्री-पेड आॅटोचालकांनी गुरुवारी विरोध दर्शवून निदर्शने आंदोलन केले.
प्री-पेड आॅटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अन्सारी यांच्या नेतृत्वात रेल्वेस्थानक परिसरात आॅटोचालक एकत्र आले. टोल फ्री क्रमांक आॅटोवर लावण्यासाठी ५० रुपये घेण्यात येत असल्याचा त्यांनी निषेध केला. रेल्वेस्थानक परिसरात प्री-पेड आॅटो बुथच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली जाते. येथील काही आॅटोवर या टोल फ्री क्रमांकाचे स्टिकर लावण्यात आले आहेत. यासंदर्भात अन्सारी म्हणाले की, टोल फ्री क्रमांकाचे स्टिकर प्रत्येक वाहनावर असणे आवश्यक आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात गेलेल्या आॅटोरिक्षा चालकांकडून ५० रुपये शुल्क घेण्यास त्यांनी विरोध दर्शविला. आॅटोंवर नि:शुल्क स्टिकर लावण्याची मागणी त्यांनी करून याबाबत आरटीओ कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ईसाक अहमद, श्याम धमगाये, शेख जावेद, शेख शहजाद, प्रदीप पाटील, प्रदीप नागदेवते, आसिफ अली, चांद खान, अशफाक खान, अलीम अन्सारी, प्रवीण बनारसे, केजूराम साहू यांच्यासह आॅटोरिक्षा चालक उपस्थित होते.