कामठीत अंगणवाडी सेविकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:56+5:302021-09-24T04:09:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना त्यांची सर्व कार्यालयीन कामे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सक्ती करण्यात आली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना त्यांची सर्व कार्यालयीन कामे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सक्ती करण्यात आली असून, त्यांना त्यासाठी शासनाकडून माेबाइल फाेनदेखील देण्यात आले आहेत. त्या फाेनमध्ये वारंवार तांत्रिक समस्या निर्माण हाेत असल्याने तसेच त्या समस्या साेडविल्या जात नसल्याने कामठी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी (दि. २३) माेबाइल परत करा आंदाेलनांतर्गत कामठी शहरातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमाेर निदर्शने केली. यात शहर व तालुक्यातील ७५ अंगणवाडी सेविका व १०५ मदतनीस सहभागी झाल्या हाेत्या.
शासनाने ऑनलाइन कामकाजासाठी दिलेले मोबाइल फाेन वारंवार हँग तसेच त्यात बिघाड निर्माण हाेत असल्याने ते कुचकामी ठरले आहेत. हे माेबाइल फाेन मध्येच बंद पडणे, त्याचे डिस्प्ले जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. या फाेनची वाॅरंटी संपल्याने त्यात बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्तीचा खर्चही त्यांनाच करावा लागताे. हा खर्च दरवेळी चार ते सहा हजार रुपये येताे. कामकाजाचे ॲप इंग्रजीत असल्याने ते हाताळण्यास त्रास हाेत असून, ग्रामीण भागात नेटवर्कची माेठी समस्या असल्याचेही अंगणवाडी सेविकांनी सांगितले.
कामठी तालुक्यासह शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गुरुवारी (दि. २३) कामठी शहरातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमाेर निदर्शने केली. या आंदाेलनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम काळे, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती अंडरसहारे, कार्याध्यक्ष जयश्री चहांदे, तालुका अध्यक्ष विशाखा हाडके, आशा पाटील, सचिव विद्या गजभिये, सीमा गजभिये, भारती नगरकर, शारदा रामटेके, लता घुटके, अनिता बावनकुळे, छाया कडू, मंदा कपाडे, संघमित्रा पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या हाेत्या.
...
सात महिन्यांपूर्वी सूचना
या सर्व समस्यांबाबत आपण संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाला सात महिन्यांपूर्वीच म्हणजे फेब्रुवारीमध्येच अवगत केले हाेते. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने १७ ऑगस्टपासून राज्यव्यापी ‘माेबाइल फाेन परत करा’ आंदाेलनाला सुरुवात करण्यात आली. याच आंदाेलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी कामठी शहरात निदर्शने करण्यात आली. शुक्रवारी (दि. २४) देशव्यापी आंदाेलन केले जाणार असून, नागपूर शहरात निदर्शने केली जाणार असल्याचेही अंगणवाडी सेविकांनी सांगितले.