संगणक परिचालकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:12+5:302021-03-05T04:08:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाकबंगला) : राज्यातील संगणक परिचालक त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काही दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदाेलन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : राज्यातील संगणक परिचालक त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काही दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदाेलन करीत हाेते. शांततेने आंदाेलन करीत असलेल्या या संगणक परिचालकांवर पाेलिसांनी लाठीमार केला असून, संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ सावनेर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावनेर पंचायत समिती कार्यालयासमाेर बुधवारी (दि. ३) निदर्शने केली. शिवाय, कामबंद आंदाेलनाचा इशारा देत, खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांच्याकडे निवेदन साेपविले.
राज्यातील संगणक परिचालकांच्या विविध समस्या १० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या समस्या साेडवाव्यात, यासाठी संघटनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २२ फेब्रुवारीपासून धरणे आंदाेलन सुरू केले. या आंदाेलनाला सावनेर तालुका संगणक परिचालक संघटनेने पाठिंबा दिला असून, आंदाेलनात तालुक्यातील काही संगणक परिचालक सहभागी झाले हाेते. दरम्यान, २ मार्चच्या रात्री आंदाेलक मैदानावर झाेपले असताना पाेलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करायला सुरुवात केली. त्यांचे मंडप काढून फेकले असून, त्यांना बळजबरीचे रेल्वेत बसवून त्यांच्या गावाला रवाना करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्यासह काही पदाधिकारी व संगणक परिचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शासनाच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी सावनेर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमाेर निदर्शने करीत शासनाच्या विराेधात नारेबाजी केली. शिवाय, खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन दिले. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या संघटनेचे पदाधिकारी व संगणक परिचालकांना साेडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली असून, कामबंद आंदाेलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे.
या आंदाेलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष आशिष गोडबोले, उपाध्यक्ष प्रदीप काटे, प्रशांत दिवे, नीलेश कुंभारे, भूषण भक्ते, सुमेध सोमकुवर, आशिष क्षीरसागर, सुलोचना बागडे, सुषमा जोगी, गीता गावंडे, दर्शन नरड, रेखा कडू, लक्ष्मी कचडे, वैशाली बेलेकर, सुनील नेवारे, राहुल पालेकर, अरुण ढोके, रवींद्र कुंभारे, रोशन पिपरेवार, सचिन धमदे, चंद्रशेखर गणभोज, आशिष वाळके, मनोज बावणे यांच्यासह सदस्य सहभागी झाले हाेते.