पालिका कर्मचाऱ्यांची कार्यालयासमाेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:50+5:302021-04-02T04:09:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : नगर परिषद कर्मचाऱ्यांना दाेन महिन्यापासून त्यांचे मासिक वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मासिक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : नगर परिषद कर्मचाऱ्यांना दाेन महिन्यापासून त्यांचे मासिक वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मासिक वेतन तातडीने देण्यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १) काळ्या फिती लावून नगर परिषद कार्यालयासमाेर निदर्शने करीत प्रशासनाचा निषेध नाेंदविला. शिवाय, मागण्या पूर्ण न केल्यास १५ एप्रिल राेजी एक दिवसाचे लाक्षणिक लेखणीबंद आणि १ मेपासून बेमुदत कामबंद आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
कामठी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व सफाई विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाेन महिन्यापासून मासिक वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. याच विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दाेन महिन्यापासून निवृत्ती वेतनाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेगातील थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यांच्या अन्य मागण्या व समस्या साेडविण्याकडे शासन व डीएमए कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात आहे. या मागण्यांसह या पालिकेतील कर्मचाऱ्यांचा काेराेना काळात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आर्थिक मदत व वारसाला नाेकरी देण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी यावेळी केली. शासनाने या मागण्यांची पूर्तता न केल्यास येत्या १५ एप्रिल राेजी एकदिवसीय लाक्षणिक लेखणीबंद आणि त्यानंतर १ मेपासून अत्यावश्यक सेवेसह बेमुदत कामबंद आंदाेलन केले जाईल, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. पालिका कार्यालयासमाेर गुरुवारी करण्यात आलेल्या आंदाेलनात संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मेथिया, सचिव प्रदीप जयस्वाल, प्रदीप भोकरे, विजय सूर्यवंशी, विनोद मेहरोलिया, संजय जयस्वाल, दर्शन गोंडाणे, पुंडलिक राऊत, मसूद अख्तर, माधुरी घोडेस्वार, रणजित माटे, आशिष राऊत, नरेश कळसे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले हाेते.