महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने, उद्या लेखनीबंद आंदोलन
By आनंद डेकाटे | Published: July 11, 2024 07:31 PM2024-07-11T19:31:34+5:302024-07-11T19:32:02+5:30
रिक्त पदांसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष : १५ पासून बेमुदत काम बंद आंदोलन
नागपूर : राज्यभरात महसूल कर्मचाऱ्यांची रिक्त असलेले पदे तातडीने भरण्यासोबतच विविध प्रलंबित मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी १० जुलैपासून आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नारे निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मागील कित्येक दिवसांपासून राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित आहेत. परंतु त्या मागण्यांची शासनाकडून पूर्तताच होत नसल्याने संघटनेच्यावतीने १० जुलैपासून टप्प्या टप्प्याने आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारला जिल्ह्याभरात पाचशेवर महसूल सहाय्यक व अव्वल कारकून यांनी काळ्या फिती लावून काम करत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. तर गुरुवारी शहरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तर तालुकास्तरावर तहसील कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी नारे निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.
संघटनेच्यावतीने १२ जुलैला लेखनीबंद आंदोलनाल करण्यात येईल. यानंतरही शासनस्तरावरून मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. गुरुवारच्या आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राज ढोमणे, जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिदोडकर, अभिषेक हिवसे, अनिल महल्ले, प्रवीण साखरवाडे, अमर शिरसाट, नितीन दातीर, संजय सहारे, प्रदीप पहापळे, स्नेहल मुरकुटे, नितीन वरे, श्रीकांत कायंदे, संजय उकुंडे रुख्साना शेख, वैशाली खारोडे, मिनाक्षी कोरडे, सुषमा महल्ले, अपर्णा वाघ, दिनेश तिजारे, विजया गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला.